

मुंबई : वांद्रे, सांताक्रूझ, कलिना या भागातील फुटपाथवर बेकायदा बस्तान मांडून बसलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ‘अडथळामुक्त फुटपाथ’, या उद्देशाने वांद्रे पूर्व विभागाने कलिना, गोळीबार रोड, सांताक्रूझ स्टेशन परिसरातील फुटपाथवरील बेकायदा बांधकामे, स्टॉल, दुकाने आदी अतिक्रमणांवर हातोडा हाणण्यात आला. वांद्रे पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘पादचारी प्रथम’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत अतिक्रमणमुक्त फुटपाथ ही मोहीम मुंबई महापालिकेने २६ विभागीय कार्यालयात राबवण्यात येत आहे. पादचाऱ्यांना सुरक्षित, मोकळे आणि अडथळामुक्त पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत एच/पूर्व विभागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. वांद्रे (पूर्व), खार (पूर्व), सांताक्रूझ (पूर्व) आणि कलिना परिसरातील प्रमुख रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली.
अनधिकृत शेड, हातगाड्या हटविल्या
राम मंदिर रोड, राजेंद्र कांबळे मार्ग, नानासाहेब धर्माधिकारी मार्ग, पंडित जवाहरलाल नेहरू रोड, कलिना चर्च रोड, कलिना-कुर्ला रोड, भारतनगर रोड, गोळीबार रोड, टीपीएस रोड, सीएसटी रोड, वाकोला मार्केट तसेच सांताक्रुझ स्टेशन रोड या भागांमध्ये पदपथ आणि रस्त्यांवरील बेकायदा अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला. या मोहिमेदरम्यान अनधिकृत दुकाने, स्टॉल, शेड, झोपड्या, फेरीवाल्यांची बाकडी, हातगाड्या, अनधिकृत मंडप तसेच पदपथावरील बेवारस वस्तूंवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर फेरीवाले, बाकडी आणि पदपथावरील बेवारस साहित्य हटविण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी पदपथ पुन्हा पादचाऱ्यांसाठी खुले झाले असून वाहतुकीलाही दिलासा मिळाला आहे.
बेवारस वाहने उचलली
महापालिकेच्या नोंदीनुसार अनेक ठिकाणी बांबू आणि ताडपत्रीच्या सहाय्याने उभारण्यात आलेली कच्ची शेड जमीनदोस्त करण्यात आली. काही ठिकाणी लोखंडी पक्के शेड, मोबाईल फूड व्हॅन, स्टॉल आणि अनधिकृत बांधकामेही हटविण्यात आली. स्थानिक वाहतूक पोलिसांच्या मदतीने बेवारस वाहने उचलण्याची कारवाई करण्यात आल्याचे अंडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सीएसटी रोड, टीपीएस रोड, गोळीबार रोड आणि कलिना-कुर्ला रोड या भागांमध्ये सर्वाधिक अतिक्रमणे आढळून आली.