

मुंबई : जवळपास साडेतीन वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आगामी निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली आहे. मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील बालगंर्धव सभागृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आरक्षण सोडतीत कोणाचा वॉर्ड कायम राहणार, कोणाला दुसऱ्या वॉर्डात नशीब आजमावे लागणार हे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आरक्षण सोडतीत दिग्गज इच्छुकांची राजकीय कारकीर्द ठरणार आहे. सन २०१७ च्या निवडणुकीत सर्वच पक्षातून प्रथमच निवडणूक लढवून विजयी झालेल्या नगरसेवकांसह दोन टर्म नगरसेवक राहिलेल्या आणि यावेळीही इच्छुक असणाऱ्या दिग्गज माजी नगरसेवकांनाही या आरक्षण सोडतीचा फटका बसणार आहे.
असे असेल आरक्षण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘बालगंधर्व रंगमंदिर, तळमजला, सभागृह येथे ही सोडत आयोजित करण्यात आली आहे.
१४ ते २० नोव्हेंबर दरम्यान हरकती सूचना
सोडतीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येईल, तर १४ नोव्हेंबर ते गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षण प्रारुपावर हरकती व सूचना सादर करता येतील. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.