

मुंबई : मुंबईत दुबार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. आतापर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमेत ११ लाख दुबार मतदारांपैकी १ लाख २५ लाख दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दुबार मतदारांची शोध घेण्याबाबत पालिकेला सूचना केली होती. त्यानुसार दुबार मतदारांची शोध मोहीम राबवण्यात येत असून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या दोन दिवस आधी पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मतदार यादीत घोळ, दुबार मतदार या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. मुंबईत १ कोटी ३ लाख मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख मतदार दुबार असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला आहे. अखेर दुबार मतदारांचा शोध घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. मतदार यादीतील दुबार नावांना दोन स्टार करण्यात आले आहे. दुबार नावे शोधून त्या मतदारांकडून हमी पत्र लिहून घ्यावे, फोटो तपासावा, अशा सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने शोध मोहीम हाती घेतली असून साधारण आठ ते दहा टक्के मतदार दुबार आढळून आले आहेत. दुबार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत सुरू राहणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
असा सुरू आहे दुबार मतदारांचा शोध
एका व्यक्तीचे नाव किती वेळा आणि कोणत्या प्रभागात नाव, वडिलांचे नाव, लिंग आणि फोटो सारखे तर दुबार नावांचा शोध
८२९ हरकती सूचना दुबार मतदारांबाबत
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या प्रभाग प्रारुप मतदार यादीबाबत एकूण ११ हजार ४९७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १० हजार ६६८ हरकती व सूचनांवर निर्णय देण्यात आला आहे. तर, उर्वरित ८२९ हरकती व सूचना दुबार मतदारांबाबत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.
सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र
मतदानादिवशी मतदारांना मतदान करण्यात अडचण येऊ नये यासाठी मुंबईतील मोठ्या सोसायट्या मध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रथमच सोसायट्या मध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार असून शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सोसायट्या मध्ये मतदान केंद्र सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सोसायट्या मध्ये मतदान केंद्र उभारण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सुरेश काकाणी यांनी सांगितले.