BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली असून मुंबईतील ८४ प्रभागांत तिरंगी, तर ११८ प्रभागांत चौरंगी लढती होत असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौरपदे भूषवलेल्या सात मातब्बरही पुन्हा नशीब आजमावत आहेत.
BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती
(Photo- https://www.mcgm.gov.in/)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली असून मुंबईतील ८४ प्रभागांत तिरंगी, तर ११८ प्रभागांत चौरंगी लढती होत असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. निवडणुकीसाठी आता १७०० उमेदवार रिंगणात असून, जिंकण्यासाठी घमासान सुरू आहे.

मतदार मातब्बरांना संधी देणार का?

या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौरपदे भूषवलेल्या सात मातब्बरही पुन्हा नशीब आजमावत आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकरडून मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर या चार माजी महापौरांना, तर सुहास वाडकर, हेमांगी वरळीकर या दोन माजी उपमहापौरांना तिकिटे दिली आहेत. भाजपकडून माजी उपमहापौर अलका केरकर निवडणूक लढवत आहेत. महापालिकेत काम करण्याचा अनुभव असलेल्या या मातब्बरांना मतदार पुन्हा संधी देणार की घरी बसवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तेजस्वी घोसाळकर यांच्या लढतीकडे लक्ष

ऐन निवडणुकीच्या काळात पक्षांतर, अनुभवी नेत्यांची उमेदवारी आणि प्रमुख पक्षांमधील थेट संघर्ष यामुळे अनेक प्रभागांतील लढती विशेष लक्षवेधी ठरत आहेत. प्रभाग क्रमांक २ मधील लढत चर्चेची ठरली आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश करून येथून उमेदवारी स्वीकारली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या धनश्री कोलगे आणि काँग्रेसच्या मेनका सिंह यांच्यात तिरंगी सामना होत आहे. या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष आहे.

रवी राजा यांच्या प्रभागात चौरंगी सामना

मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रभाग क्रमांक १८६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जगदीश शिवालप्पी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मोहम्मद इरफान खान, तसेच काँग्रेसचे कमलेश लालजी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथे चौरंगी सामना रंगणार असून रवी राजा यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागणार असे दिसते.

यामिनी जाधव यांची प्रतिष्ठा पणाला

पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी व माजी आमदार यामिनी जाधव या प्रभाग क्रमांक २०९ मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या हर्षदा सुर्वे, मनसेच्या हसिना माहिमकर आणि काँग्रेसच्या राफिया दामोदी यांच्यात चौरंगी लढत होत आहे. हा प्रभागही निकालाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून जाधव यांच्यासह पती यशवंत जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रभाग क्रमांक ५९ मध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक शैलैश फणसे, भाजपाचे योगिराज दाभाडकर आणि काँग्रेसचे जयेश सांधे यांच्यात तिरंगी सामना होत आहे.

राजूल पटेल यांच्या प्रभागात बहुपक्षीय लढत

प्रभाग क्रमांक ६१ मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) राजूल पटेल यांच्याविरोधात ठाकरे शिवसेने च्या सेजल, काँग्रेसच्या दिव्या सिंह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आफरिन टोळे यांच्यात बहुपक्षीय लढत होत आहे. अशीच चुरस प्रभाग क्रमांक ६२ मध्येही पाहायला मिळत असून येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर यांच्याविरोधात भाजपाचे रूपेश सावरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सैफ खान यांच्यात चौरंगी लढत रंगणार आहे.

पूजा महाडेश्वरांच्या वॉर्डत बहुरंगी सामना

प्रभाग क्रमांक ८७ मध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पूजा महाडेश्वर, भाजपाचे कृष्णा (महेश) पारकर, काँग्रेसचे प्रमोद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संदीप उधारकर यांच्यात चौरंगी सामना होत आहे. प्रभाग क्रमांक १५१ मध्येही बहुरंगी लढत असून शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सानिया थोरात, भाजपाच्या कशिश फुलवारिया, काँग्रेसच्या संगीता भालेराव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या वंदना सावळे यांच्यात तिरंगी/चौरंगी सामना रंगणार आहे.

विशाखा राऊत-प्रिया सरवणकर थेट लढत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १७०० उमेदवार उतरले असून, जिंकण्यासाठी घमासान सुरू आहे. शिवसेनेचे माजी विभागप्रमुख असलेले मिलिंद वैद्य हे १९९६-९७ मध्ये मुंबईचे महापौर होते. ते शिवसेना ठाकरे पक्षाकडून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे राजन सुरेश पारकर आणि दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे. शिवसेनेतील फुटीमुळे माजी आमदार सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे वैद्य यांच्या विजयाचा मार्ग सोपा नाही. शिवसेना ठाकरे पक्षाकडून माजी महापौर विशाखा राऊत रिंगणात आहेत. त्या १९९७-९८ मध्ये महापौर होत्या. सध्या त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या प्रिया सरवणकर-गुरव यांचे आव्हान आहे. त्या माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत. या प्रभागात केवळ दोनच उमेदवार असल्याने थेट लढत होणार आहे.

किशोरी पेडणेकरांना कडवे आव्हान

शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर मैदानात उतरल्या आहेत. २०१९ - २२ मध्ये त्या मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे सेनेच्या रूपल राजेश कुसळे यांच्यासह बसप, वंचित बहुजन आघाडी आणि सात अपक्षांचे आव्हान आहे. त्यामुळे पेडणेकर यांची वाट बिकट असणार आहे. तसेच २००९ -१२ या कालावधीत मुंबईच्या महापौर असलेल्या श्रद्धा जाधव शिवसेना ठाकरे सेना पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या पार्थ बावकर आणि बंडखोर विजय इंदुलकर यांचे आव्हान आहे. इंदूलकरामुळे शिवसेना ठाकरे पक्षाची मतविभागणी होण्याचा धोका आहे. त्याशिवाय वंचित, बसप आणि तीन अपक्षही या प्रभागातून लढत आहेत.

उमेदवारांची संख्या घटली

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. सगळ्या महापालिकांमधील लढतीचे अंतिम चित्रही स्पष्ट झाले आहे. परंतु, गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकांत राज्यातील बहुतांशी महापालिकांमध्ये उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचे चित्र आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काही शहरांत ही घसरण ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारण, निवडणूक खर्च, पक्षीय गणिते आणि प्रशासकीय अनिश्चितता यांचा थेट परिणाम लोकशाही सहभागावर होत असल्याचे हे आकडे सूचित करतात.

सर्वाधिक घसरण पनवेलमध्ये

या आकडेवारीनुसार सर्वाधिक घसरण पनवेल येथे दिसून येते. पनवेल महापालिकेच्या मागील निवडणुकीत ४१८ उमेदवार रिंगणात होते. यंदा ही संख्या २५५ वर आली असून ३९ टक्के घट नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर (३५.८०%), कल्याण-डोंबिवली (३४.८०%) आणि नवी मुंबई (२६.५०%) या शहरांचा क्रम लागतो. राज्याची राजधानी मुंबई येथेही उमेदवारांची संख्या २,२७५ वरून १,७०० वर आली असून सुमारे २५.३० टक्के घट झाली आहे. भिवंडी-निजामपूर आणि चंद्रपूर येथील महापालिकांमध्ये मात्र उमेदवार संख्येतील घट तुलनेत कमी अर्थात ५ टक्क्यांखाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in