
मुंबई : मुंबई महानगरपालिकेवरील सत्तासंग्राम निर्णायक टप्प्यात जात असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रतिस्पर्धी शिवसेना (ठाकरे गट) गणेश मंडळांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आक्रमक प्रयत्न करत आहेत. सामाजिक-सांस्कृतिक तसेच राजकीय प्रभाव असलेली ही मंडळे परंपरेने पक्षनिष्ठ कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे केंद्र मानली जातात.
शिंदे गटाचा दावा आहे की गणेशोत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या "अभूतपूर्व" आर्थिक मदतीमुळे अनेक मंडळे त्यांच्याकडे वळली आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी प्रतिस्पर्धी गटावर पैशाच्या जोरावर मंडळांना फूस लावल्याचा आरोप केला.
मंडळ कोण नेत आहे? कुठे नेणार? शेवटी मुंबईतच राहायचे आहे. आम्हाला गणपती बाप्पाची कृपा असेपर्यंत तुम्ही मंडळं नेलीत तरी त्याचे आम्हाला काही वाटत नाही," असे ठाकरे यांनी यापूर्वी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना उद्देशून सांगितले होते.
शिवसेना शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उदार मदतीमुळे शिंदे यांची लोकप्रियता मंडळांमध्ये वाढली आहे.
मुंबईतील जवळपास ८ हजार नोंदणीकृत व १४ हजार नोंदणी नसलेली गणेश मंडळे आहेत. दहीहंडी, नवरात्र, काही ठिकाणी साईबाबा उत्सव असे कार्यक्रम आयोजित करणारी ही मंडळे स्थानिक राजकारणाशी खोलवर जोडलेली असल्याचे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी भाजपाने शिवसेनेच्या गढीत मोठी घुसखोरी केली होती. २२७ पैकी ८२ जागा जिंकत त्यांनी शिवसेनेच्या ८४ जागांच्या जवळपास पोहोच घेतली होती. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमताचा ११४ जागांचा आकडा गाठता आला नव्हता.
काँग्रेस ३१ जागांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसला ९, राज ठाकरे यांच्या मनसेला ७, एआयएमआयएमला ३, समाजवादी पक्षाला ६, अखिल भारतीय सेनेला १ आणि अपक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या.
बहुतेक गणेश मंडळांवर एकसंघ शिवसेनाचे वर्चस्व राहिले होते. लालबाग-परेळमधील (एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला) एका शिवसेना (उद्धव गट) पदाधिकाऱ्याने सांगितले की, १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापनेनंतर कार्यकर्त्यांना गणेशोत्सव, नवरात्र व दहीहंडी मंडळांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दशकानुदशके शिवसेनेचे वर्चस्व या मंडळांवर टिकले. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत पक्षफुटीनंतर आणि शिंदे यांच्या उदयानंतर परिस्थितीत बदल दिसू लागला.