

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या वंचित बहुजन आघाडीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित १५० जागा लढेल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे.
दैनिक नवशक्ती आणि 'फ्री प्रेस जर्नल' च्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. युती-आघाडी करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीने "एकला चलो"ची भूमिका घेतली आहे. वंचितला सध्या कोणी बरोबर घेत नाही. कोणी बरोबर आले तर त्यांना सोबत घेणार, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
आरक्षण, देशातील निवडणूक आणि राष्ट्रीय स्तरावर दलितांचे नेते म्हणून नेतृत्व करणार नसल्याबाबत यावेळी आंबेडकर यांनी भाष्य केले. देशातील इतर पक्षांच्या तुलनेत भाजप निवडणूक रणनीती ठरविण्यामध्ये १० पाऊले पुढे आहे. भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भाजपा हा मनुवादी विचारसरणी मानणारा पक्ष आहे. तसाच गांधीवादाच्या आडून काँग्रेस हिंदुत्ववाद मानणारा पक्ष असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांकडून व्यापारी कमी दरात माल विकत घेतो. आणि त्याच मालाची दुप्पट दराने विक्री करत असल्याने यामध्ये व्यापारी मालामाल होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना समान न्याय देणारे सरकार सत्तेत हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
देशभरात झालेली शेतकऱ्यांची आंदोलने चिरडण्यात आली असून शेतकऱ्यांनी लढाऊ कार्यकर्त्याला निवडून देणे गरजेचे आहे. सध्या मतदारांच्या मानेवर घराणेशाहीचे भूत बसले असल्याचे सांगितले.