१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

पालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार शहराबाहेर कार्यरत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सुटी लागू राहील, असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या दिवशी महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचे अध्यादेश निर्गमित केले आहेत.

निर्णयाची या अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी स्वतंत्र 'दक्षता पथके' स्थापन केली आहेत. मतदानाच्या दिवशी सुटी किंवा आवश्यक सवलत न दिल्यास संबंधित आस्थापनांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

पालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाची शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना ही सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे. पालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार शहराबाहेर कार्यरत असले तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सुटी लागू राहील, असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागानेही सार्वजनिक सुटीबाबत स्वतंत्र आदेश काढले असून, सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्या, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार व औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स व रिटेलर्स यांनाही सुटी लागू राहणार आहे.

...तर या क्रमांकावर संपर्क साधा

मतदानाच्या दिवशी सुटी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक ९१२२-३१५३३१८७ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in