BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात १५० जागांवर एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांवर चर्चा सुरू आहे, असे साटम यांनी सांगितले. NCP बाबत विचारले असता, 'आमची भूमिका आहे की, नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आमचं काही देणं-घेणं नाही. जोपर्यंत...
BMC Election : महायुतीतून अजित दादांची NCP आउट, भाजप-शिवसेनेचं १५० जागांवर ठरलं; अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती
Published on

आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात १५० जागांवर एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांवर चर्चा सुरू आहे. पुढील दोन-चार दिवसांमध्ये त्याबाबतही चर्चा करू असे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज सांगितले. शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपासाठी झालेल्या दुसऱ्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आमचं काही देणं-घेणं नाह, असे सांगत मुंबई महापालिकेसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नसेल असेही स्पष्ट केले.

फडणवीस आणि शिंदे घेणार अंतिम निर्णय

"महायुतीची चर्चा बीएमसी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून, मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये झालेली आहे. या चर्चेमध्ये निवडणुकीची तयारी, निवडणुकीचे व्यवस्थापन, कॅम्पेन, चर्चेतले मुद्दे, निवडणुकीचे मुद्दे, भाषणाचे मुद्दे, निवडणुकीच्या सभा आणि इतर मुद्द्यांवर विस्तृत प्लॅनिंग झालं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभा कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये घ्यायच्या याबाबत चर्चा झाली आहे. बीएमसीच्या २२७ जागांपैकी १५० जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित जागांची चर्चा सुरू आहे. पुढच्या दोन-चार दिवसांमध्ये उर्वरित जागांवर चर्चा करू. अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्यानंतर याची जी काही घोषणा असेल ती होईल", असे साटम म्हणाले.

कोणता पक्ष किती जागा लढेल?

१५० पैकी कोणता पक्ष किती जागा लढेल असे विचारले असता ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही, महायुती २२७ जागा लढवणार हे महत्त्वाचं आहे. मुंबई शहराला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणे महत्त्वाचं आहे. मुंबई महापालिका एका परिवाराची जहागीर आहे हे जे लोक समजतात त्यांना उत्तर देणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी महायुती यासाठी सज्ज आहे, असे साटम म्हणाले. उमेदवारांसदर्भात अजून चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

१५० पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर बसणार

जागावाटपाचा फॉर्म्युला कोणता असे विचारले असता मुंबईच्या महानगपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन द्यायचे आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाई महायुती कटिबद्ध आहे. त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही. २२७ जागांवर महायुती लढेल आणि १५० पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर, मुंबईच्या महापालिकेवर विराजमान होईल, असा विश्वासही साटम यांनी व्यक्त केला. येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन देणे, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखणं आणि जसं काही लोक आपल्या मतांच्या लांगूलचालनासाठी या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, तो प्रयत्न हाणून पाडणं याच्यावरती आमचं एकमत आहे आणि त्याकरता मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्या बाजूने देण्याचा निर्णय केलेला आहे, असे ते म्हणाले.

धनुष्यबाळ आणि कमळ हे एकच

पुढे बोलताना, फॉर्म्युला काय असतो, महायुती इतकी घटट् आहे की २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही बघितलं की भाजपचे १० कार्यकर्ते धनुष्यबाणावर लढले, धनुष्यबाणाचे काही कार्यकर्ते कमळावरती लढले. त्यामुळे धनुष्यबाळ कमळ हे एकच आहे. शेवटी मुंबईकरासाठी काम करणं शेवटच्या मुंबईकराला बीएमसीच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवणं महत्त्वाचं आहे, असे साटम म्हणाले.

महायुतीतून NCP आउट

आमची भूमिका आहे की, नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आमचं काही देणं-घेणं नाही. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप आहेत आणि अशा आरोपांमधून जोपर्यंत ते निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही, असे साटम यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक नाही तर मग त्यांच्या कन्या सना मलिक चालतील का असे विचारले असता राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत युती करण्यास इच्छुक नाही. उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी सोपवली तर त्याचे स्वागत आहे, असे साटम यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in