

मुंबई : पवईतील आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या बांधकामस्थळावरून धुळीचे लोट उठून परिसरात धुळीचे वादळ निर्माण झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. याची दखल घेत पालिकेच्या एस विभाग कार्यालयाने संबंधित बांधकामस्थळाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
प्रकल्पाचे काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी दिली. पवईतील या बांधकामस्थळावरून मोठ्या प्रमाणात धूळ हवेत पसरत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते.
‘मुंबई मॅटर्स’ या एक्स खात्यावरून हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. धुळीचे दाट लोट आजूबाजूच्या परिसरात पसरत असताना महापालिकेच्या धूळ प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांची अंमलबजावणी कुठे आहे, असा सवाल या पोस्टमधून उपस्थित करण्यात आला होता.
पाहणी करून ठोठावला दंड
व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेच्या एस विभागातील घनकचरा व्यवस्थापन पथकाने मंगळवारी घटनास्थळी धाव घेतली. ‘ध्यानकुंज’ इमारतीच्या बांधकामस्थळाची पाहणी करण्यात आली. हवेच्या प्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्या प्रकरणी तपासणी अहवाल जारी करण्यात आला.
धोकादायक इमारतींचे पाडकाम सुरू
संबंधित बांधकामस्थळावर एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून प्रकल्पाचे काम थांबवण्याची नोटीसही बजावण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, संबंधित इमारत ‘सी-१’ श्रेणीत मोडते. ही श्रेणी जीर्ण आणि धोकादायक इमारतींसाठी वापरली जाते. अशा इमारतींचे बांधकाम किंवा पाडकाम करताना धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ पसरल्याने नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.