Mumbai : अन्न तपासणीचा अहवाल २४ तासांत; मोबाईल, ई-मेलवर मिळणार माहिती

नागरिकांना शुद्ध आणि दर्जेदार अन्न व पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची दादर येथील महापालिका विश्लेषक प्रयोगशाळा गेल्या १२३ वर्षांपासून कार्यरत असून या प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक अन्न व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते.
Mumbai : अन्न तपासणीचा अहवाल २४ तासांत; मोबाईल, ई-मेलवर मिळणार माहिती
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : नागरिकांना शुद्ध आणि दर्जेदार अन्न व पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची दादर येथील महापालिका विश्लेषक प्रयोगशाळा गेल्या १२३ वर्षांपासून कार्यरत असून या प्रयोगशाळेत दरवर्षी सुमारे ७० हजारांहून अधिक अन्न व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. आता पाणी तसेच अन्न तपासणीचा अहवाल २४ तासांत मिळणार असून तो मोबाईल तसेच ई-मेलवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक, गृहसंस्था आणि व्यावसायिक आस्थापनांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी केले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ही प्रयोगशाळा पाण्याच्या विविध नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वितरीत होणाऱ्या पाण्याचे नमुने, खाऊ गल्ल्यांमधील खाद्यपदार्थ, बर्फ, बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी तसेच जलतरण तलावातील पाण्याचे नमुने नियमितपणे तपासले जातात. दरवर्षी सुमारे ४५ हजारांहून अधिक पाण्याच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात येते. विशेष म्हणजे पाण्याच्या तपासणीचा अहवाल अवघ्या २४ तासांत उपलब्ध करून दिला जातो. हा अहवाल नागरिकांना ई-मेल व व्हॉट्सअॅपद्वारे, तर आस्थापनांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतो.

१९०३ पासून मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहे. काळानुरूप तिचे आधुनिकीकरण करण्यात आले असून गेल्या दहा वर्षांत सुमारे सात लाखांहून अधिक अन्न व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी येथे करण्यात आली आहे. मुंबईतील अन्न व पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी ही महापालिकेची एकमेव प्रयोगशाळा आहे.

सुमारे ८ हजार नमुन्यांची दरवर्षी तपासणी

महापालिका विश्लेषक प्रयोगशाळेत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून पाठवण्यात येणारे अन्न व पाण्याचे नमुने, शालेय मध्यान्ह भोजनाचे नमुने तसेच पोलीस विभागाकडून पाठवण्यात येणारे प्रतिबंधित पदार्थ, गुटखा, सुगंधी सुपारी आणि सुगंधी तंबाखूचे नमुनेही तपासले जातात. अशा सुमारे आठ हजार नमुन्यांची तपासणी दरवर्षी केली जाते.

लवकरच नूतनीकरण करणार

अत्याधुनिक उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्रयोगशाळेला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून राज्यस्तरीय अन्न प्रयोगशाळेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. मुंबईकरांना अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयोगशाळेच्या अद्ययावतीकरणाचा प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे.

अल्पदरातील सुविधेचा लाभ घ्या!

अन्न आणि पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्या प्रयोगशाळेत अत्यल्प दरात तपासणीची सुविधा उपलब्ध असून नागरिक, गृहसंस्था, खाद्यपदार्थ विक्रेते आणि विविध व्यावसायिक आस्थापनांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी केले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in