Mumbai : उपाहारगृहासाठी फिल्डिंग! घाटकोपरचा एक कंत्राटदार उत्सुक; खाद्यपदार्थ महागणार; ऑक्टोबरनंतर खिशाला कात्री

ताकाच्या ग्लासात माशी, भजीत प्लास्टिक धागा यामुळे महिनाभर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला अन्न व औषध प्रशासन विभागाने सील ठोकले होते. महिनाभरानंतर उपाहारगृह सुरू होताच जुन्या कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखवत उपाहारगृह चालवण्यासाठी मिळावे, यासाठी अनेक कंत्राटदार पालिका मुख्यालयात चपला झिजवत आहेत.
Mumbai : उपाहारगृहासाठी फिल्डिंग! घाटकोपरचा एक कंत्राटदार उत्सुक; खाद्यपदार्थ महागणार; ऑक्टोबरनंतर खिशाला कात्री
Mumbai : उपाहारगृहासाठी फिल्डिंग! घाटकोपरचा एक कंत्राटदार उत्सुक; खाद्यपदार्थ महागणार; ऑक्टोबरनंतर खिशाला कात्री
Published on

मुंबई : ताकाच्या ग्लासात माशी, भजीत प्लास्टिक धागा यामुळे महिनाभर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला अन्न व औषध प्रशासन विभागाने सील ठोकले होते. महिनाभरानंतर उपाहारगृह सुरू होताच जुन्या कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखवत उपाहारगृह चालवण्यासाठी मिळावे, यासाठी अनेक कंत्राटदार पालिका मुख्यालयात चपला झिजवत आहेत. परंतु मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह चालवण्यासाठी मिळावे यासाठी घाटकोपरमधील एका कंत्राटदाराने फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.

दरम्यान, मुख्यालयासह २६ विभागीय कार्यालयांतील उपाहारगृहांमधील खाद्यपदार्थांचे दर ऑक्टोबरनंतर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांत खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने वाढत्या महागाईचा विचार करून दर सुधारित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीनंतर काही त्रुटी निदर्शनास आल्याने उपाहारगृहावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक सुधारणा आणि नियमांची पूर्तता केल्यानंतर उपाहारगृह पुन्हा सुरू करण्यात आले.

महापालिका मुख्यालयात सुमारे पाच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून दररोज मोठ्या संख्येने अभ्यागतही येथे येत असतात. त्यामुळे येथील उपाहारगृहाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याच धर्तीवर महापालिकेच्या २६ विभागीय कार्यालयांमध्येही उपाहारगृहे कार्यरत आहेत.

नाश्त्याचे पदार्थ, जेवण, थाळी तसेच काही पेयांच्या दरांमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते. मेदू वडा, भजी, मिसळ, पोहा, शिरा, ढोकळा, सँडविच, दही वडा यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. सध्या ३० रुपयांत उपलब्ध असलेल्या जेवणाच्या दरात वाढ होऊ शकते, तर मुख्यालयातील डिलक्स थाळीच्या किमतीतही वाढ अपेक्षित आहे. सुधारित दर मुख्यालयासह सर्व विभागीय कार्यालयांतील उपाहारगृहांना लागू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिका मुख्यालयातील उपाहारगृह चालविणाऱ्या सध्याच्या कंत्राटदाराचा करार ऑक्टोबरमध्ये संपुष्टात येत आहे. त्यानंतर नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच काही इच्छुक कंत्राटदारांनी उपाहारगृहाची पाहणी केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. मात्र नव्या कंत्राटदाराची नियुक्ती ही नियमानुसार निविदा प्रक्रियेतूनच केली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तीन वर्षांनंतर दरवाढ

नाश्त्यामधील मेदू वडा, भजी, मिसळ, ओनियन उत्तप्पा, पोहा, शिरा, ढोकळा, व्हेज सँडविच, दही वडा आदी खाद्यपदार्थांचे दर सध्या १२ रुपये, १८ रुपये, २४ रुपये, ३० रुपये असून या पदार्थांच्या दरात वाढ होईल. मात्र १२ रुपये मिळणारा १५० मिली चहा आता १०० मिली मिळेल, त्याचा दर मात्र दहा रुपये असेल. ३० रुपये असलेला लंच हा साधारण दहा रुपयांनी, तर मुख्यालयात आता मिळणारी ४८ रुपये डिलक्स थाळी ही १५ ते २० रुपयांनी वाढणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होईल. महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहांसह सर्व २६ वॉर्डांमधील उपाहारगृहातही हे दर लागू राहतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in