

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने मोफत उपचारांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयांना वर्षभरात सुमारे १२०० कोटी रुपयांच्या औषधांची गरज असताना पालिकेकडून फक्त ३०० कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे. गरजेच्या अवघ्या २५ टक्के निधी उपलब्ध होत असल्याने रुग्णांना आवश्यक औषधे बाहेरील मेडिकलमधून खरेदी करावी लागत आहेत.
औषधाबरोबरच तपासण्या, एक्स-रे आणि सोनोग्राफीसाठीही रुग्णांना बाहेर पाठवले जात असल्याचा मुद्दा गुरुवारी महापालिका सभागृहात उपस्थित झाला. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नांची सरबत्ती केली.
काँग्रेस नगरसेवक अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे औषधांच्या तुटवड्याचा प्रश्न उपस्थित केला.
खिशाला कात्री
पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा अपुरा असल्याने त्यांना बाहेरील मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागत आहेत. तपासण्या आणि वैद्यकीय सुविधांसाठीही बाहेर जावे लागत असल्याने उपचारांचा खर्च वाढत आहे. औषधांची खरेदी प्रक्रिया, पुरवठादार कंपन्यांच्या दिरंगाईमुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा मुद्दा सभागृहात अधोरेखित झाला.