Mumbai : पालिका रुग्णालयांतील नियमित OPD सेवा बंद; आजपासून रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता, निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांतील नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बुधवार, ५ ऑगस्टपासून बंद ठेवण्याचा निर्णय मार्डने जाहीर केला आहे.
Mumbai : पालिका रुग्णालयांतील नियमित OPD सेवा बंद; आजपासून रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता, निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा
Mumbai : पालिका रुग्णालयांतील नियमित OPD सेवा बंद; आजपासून रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता, निवासी डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयांतील नियमित बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा बुधवार, ५ ऑगस्टपासून बंद ठेवण्याचा निर्णय मार्डने जाहीर केला आहे. सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध आणि निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या मार्ड संघटनेने स्पष्ट केले आहे. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार आहे.

सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना ब्रिज कोर्सच्या माध्यमातून एमएमसी नोंदणी देणे हे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रस्थापित निकषांशी विसंगत असून त्यामुळे एमएमसी नोंदणी व्यवस्थेची विश्वासार्हता कमी होण्याची आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती आहे. सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय पद्धतींचा आदर असून, क्रॉसपॅथीला आणि व्यावसायिक व नियामक निकषांच्या शिथिलीकरणाला विरोध असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी सुरू करू नये, निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने तातडीने चर्चा करावी आणि वैद्यकीय शिक्षणाचे तसेच रुग्ण सुरक्षेचे प्रस्थापित निकष कायम ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

...तर आंदोलन अधिक तीव्र होईल

सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि कायदेशीर तसेच लोकशाही मार्गाने पुढील टप्प्यातील आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ‘मार्ड’ने दिला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in