अधिष्ठाताच करणार पुनरावलोकन; कामकाजाच्या पुनरावलोकनासाठी वेगळी पद्धत, मुंबई महापालिकेचा नवा निर्णय

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आणि कारभारात सुधारणा करण्यासाठी पालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अधिष्ठाताच करणार पुनरावलोकन; कामकाजाच्या पुनरावलोकनासाठी वेगळी पद्धत, मुंबई महापालिकेचा नवा निर्णय
अधिष्ठाताच करणार पुनरावलोकन; कामकाजाच्या पुनरावलोकनासाठी वेगळी पद्धत, मुंबई महापालिकेचा नवा निर्णय(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आणि कारभारात सुधारणा करण्यासाठी पालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 'पीअर-रिव्ह्यू' प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एका पालिकेच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) दुसऱ्या रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या कामकाजाची पाहणी करतील, त्रुटी शोधतील आणि आवश्यक सुधारणा सुचवतील.

आरोग्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सांगितले की, या प्रणालीमुळे वरिष्ठ वैद्यकीय प्रशासक त्यांच्या 'सिस्टर' रुग्णालयांच्या कामकाजाची पाहणी करतील. उदाहरणार्थ, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता केईएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतील.

डॉक्टरांच्या उपस्थितीवर विशेष भर

पालिक रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती व उपलब्धतेबाबत उपस्थित होणाऱ्या चिंतांच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा आणली जात आहे. वर्मा यांनी स्पष्ट केले की, अधिष्ठातांना सांगण्यात आले आहे की डॉक्टरांनी केवळ रुग्णालयात उपस्थित राहणे पुरेसे नाही, तर ते त्यांना सोपवलेली कर्तव्ये पूर्ण करताना दिसले पाहिजेत. बहुतेक डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत असले तरी काही प्रकरणांमध्ये कारवाईची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अभ्यास पद्धत

‘पीअर-रिव्ह्यू हा नेहमीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि विचारांच्या देवाणघेवाणीचा एक भाग असतो. मी हीच पद्धत पालिकेत सुरू करत आहे,’ असे सांगत वर्मा-लवंगारे पुढे म्हणाल्या की, या यंत्रणेमुळे एका वैद्यकीय प्रशासकाला दुसऱ्या प्रशासकाला समकक्ष स्तरावर त्रुटी दाखवून देणे शक्य होईल.

आरोग्य कार्यकर्त्यांची सावध प्रतिक्रिया

आरोग्य कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही पीअर-रिव्ह्यू यंत्रणा केवळ औपचारिकता किंवा नावापुरती न राहता परिणामकारक ठरली पाहिजे, जिथे भेट देणारी पथके त्रुटींकडे दुर्लक्ष करणार नाहीत. त्यांनी सुचवले की, पालिकेने प्रमुख निकषांचा समावेश असलेली एक मानक तपासणी सूची तयार करावी आणि भेट देणाऱ्या अधिष्ठातांना त्रुटी दर्शवणारा व सुधारणा सुचवणारा सविस्तर अहवाल सादर करणे अनिवार्य करावे. 'पीअर-रिव्ह्यू केवळ मैत्रीपूर्ण न राहता तो निकाल देणारा असावा,' असे कोठारी म्हणाले.

सहाय्यक आयुक्तांवरही नवी जबाबदारी

पालिकेने आरोग्यविषयक प्रत्यक्ष भेटींमध्ये सहाय्यक महापालिका आयुक्तांचाही अधिकृतपणे समावेश केला आहे. हे अधिकारी आपापल्या प्रभागातील प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच बाह्यस्रोत आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालणाऱ्या सेवांवर लक्ष ठेवतील. याशिवाय, बाह्यस्रोत सेवांचे मूल्यमापन करण्यासाठी 'गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड' यंत्रणा आणि सेवा-स्तरीय निर्देशकांद्वारे खासगी ऑपरेटर्सच्या कामगिरीचे निरीक्षण करण्याची तयारी पालिका प्रशासन करत असल्याचे वर्मा यांनी नमूद केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in