मुंबई : उन्हाच्या तडाख्यामुळे आधीच लोकांचा घामटा निघाला असताना ऐन उन्हाळ्यात समुद्र खवळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभाग व इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसने दिला आहे. रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. रविवारी सकाळी ९.५० व रात्री ९.५६ वाजता समुद्रात ‘हायटाईड’ आहे. या कालावधीत समुद्रकिनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांत उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यावेळी नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे तसेच मच्छीमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
समुद्रात अधिक उंचीच्या लाटा उसळण्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश दिले आहेत. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवास असलेल्या नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवाव्यात, उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या परिस्थितीवर मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी या कालावधीत घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात शिरू नये. तसेच समुद्रकिनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.