Mumbai : ऑर्किड सिटी सेंटर मॉल रिकामा करा; गाळे, युनिट्स व दुकानधारकांना पालिकेच्या नोटिसा

मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावरील ऑर्किड सिटी सेंटर मॉलमध्ये २०२० मध्ये अग्निभडका उडाला होता.
Mumbai : ऑर्किड सिटी सेंटर मॉल रिकामा करा; गाळे, युनिट्स व दुकानधारकांना पालिकेच्या नोटिसा
Mumbai : ऑर्किड सिटी सेंटर मॉल रिकामा करा; गाळे, युनिट्स व दुकानधारकांना पालिकेच्या नोटिसा
Published on

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील बेलासिस मार्गावरील ऑर्किड सिटी सेंटर मॉलमध्ये २०२० मध्ये अग्निभडका उडाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे.

मॉलची इमारत रिकामी करण्यासाठी संबंधित मालक, विकासक तसेच गाळे, युनिट्स आणि दुकानांचे वापरकर्ते व भोगवटादारांना संयुक्त नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सक्षम प्राधिकरणाची रितसर परवानगी मिळेपर्यंत मॉलमध्ये प्रवेश करण्यास अथवा त्याचा कोणत्याही प्रकारे वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाच्या वतीने नुकतीच या संदर्भात समन्वय बैठक घेण्यात आली. बैठकीस महानगरपालिकेच्या विविध संबंधित विभागांचे अधिकारी, नागपाडा पोलीस, बेस्ट उपक्रम तसेच ऑर्किड सिटी सेंटर मॉलचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे स्वेच्छेने आणि काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना यावेळी मॉल प्रशासनाच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.

संपूर्ण इमारत सर्व प्रकारच्या हालचाली व कामकाजासाठी सुरक्षित असल्याबाबत आणि सर्व वैधानिक अटींची पूर्तता झाल्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे समाधान होईपर्यंत इमारतीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व मजल्यांसह संपूर्ण इमारत बंद ठेवावी आणि कोणालाही परिसरात प्रवेश देऊ नये, असेही न्यायालयाच्या निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

निर्देशांचे पालन न केल्यास सील करणार!

निर्देशांचे पालन न केल्यास परिसर रिकामा करून तो सील करण्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. संबंधित विभाग त्यांच्या वैधानिक कार्यक्षेत्रानुसार स्वतंत्रपणे आवश्यक कार्यवाही करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मॉलचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश

मॉल परिसरात नागरिकांना व वापरकर्त्यांना प्रवेश, वापर आणि वास्तव्यास मनाई करणाऱ्या जाहीर सूचना लावण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पूर्तता होईपर्यंत आणि सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी मिळेपर्यंत संपूर्ण ऑर्किड सिटी सेंटर मॉलचा वापर करता येणार नाही तसेच तेथे प्रवेश पूर्णपणे निषिद्ध राहील, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in