
मुंबई : बेकरी, हॉटेल, उपहारगृहामध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. परिणामी, वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पालिकेने तंदूर खाद्यपदार्थ बनविणाऱ्या ४१४ हॉटेल चालकाना नोटीस बजावली आहे. ही कारवाई जानेवारीपासून २८ फेब्रुवारी करण्यात आली, अशी माहिती मुंबई पालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने देण्यात आली.
दक्षिण मुंबई परिसरात तंदूर व्यवसायाची संख्या अधिक आहे. या ठिकाणी लाकूड, कोळसा आणि फर्निचर यांच्या माध्यमातून तंदूर पेटवले जाते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलांची तपासणी करून नोटीस बजावण्यात येत आहे. हॉटेलच्या हद्दीत तंदूरआधारित नॉन व्हेज, रोटी आदी पदार्थ केले जातात.
या विभागात बजावल्या सर्वाधिक नोटीस
मुंबईत एकूण १६ हजारांहून अधिक लहानमोठी हॉटेल आहेत. त्यापैकी ४१४ हॉटेलांना यासंदर्भात नोटिस बजावल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे, ६१ नोटिस महापालिकेच्या ई वॉर्डमधील भायखळ्यातील हॉटेलांना बजावण्यात आल्या आहेत. तर वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळ या जी दक्षिण वॉर्डमध्ये १०७ हॉटेलांना नोटिशी बजावल्या आहेत. तर कुर्ला विभागातील ६३, परळ, लालबाग या एफ दक्षिण वॉर्डमध्ये ४३ आणि सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या एच पूर्व वॉर्डमधील २६ हॉटेलांना नोटीस देण्यात आली आहे.