Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार

उघडे, तुटलेले किंवामॅनहोलवरील झाकण गायब झाले असेल तर मुंबईकरांना तातडीने तक्रार करता यावी व तक्रार मिळताच जलद कारवाई करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट (९३२४५००६००) सुरू केला आहे.
Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार
Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार
Published on

मुंबई: उघडे, तुटलेले किंवामॅनहोलवरील झाकण गायब झाले असेल तर मुंबईकरांना तातडीने तक्रार करता यावी व तक्रार मिळताच जलद कारवाई करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट (९३२४५००६००) सुरू केला आहे. या सुविधेमुळे नागरिकांना घटनास्थळाचे लोकेशन आणि छायाचित्र पाठवून काही मिनिटांत तक्रार नोंदवता येणार असून त्यासाठी तक्रार क्रमांकही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

पालिकेने तक्रार व्यवस्थापन अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू केली आहे. उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर, गटाराच्या झाकणांशी संबंधित समस्या तसेच इतर नागरी तक्रारी विविध डिजिटल माध्यमांतून नोंदवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, उघडे, तुटलेले किंवा गायब झालेले मॅनहोल कव्हर तसेच इतर धोकादायक नागरी समस्या आढळल्यास नागरिकांनी तत्काळ उपलब्ध डिजिटल माध्यमांचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

अशी करा तक्रार

स्वतंत्र मॅनहोल चॅटबॉटवर तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी ९३२४५००६०० या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवून संवाद सुरू करायचा आहे. त्यानंतर 'तक्रार सबमिट करा' हा पर्याय निवडून संबंधित ठिकाणाचे लोकेशन शेअर करावे आणि समस्येचे छायाचित्र अपलोड करावे. तक्रार नोंदल्यानंतर नागरिकाला पुढील पाठपुराव्यासाठी तक्रार नोंदणी क्रमांक मिळणार आहे.

याशिवाय 'माय बीएमसी मार्ग' मोबाईल अॅपवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल क्रमांक आणि ओटीपीच्या सहाय्याने लॉग-इन करून नवीन नोंदणी पर्यायातून तक्रारीचा प्रकार निवडावा, आवश्यक असल्यास समस्येचे वर्णन करावे आणि जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करावे. त्यानंतर तक्रार क्रमांक प्राप्त होतो.

जिओ टॅग छायाचित्रासाठी लिंक

पालिकेचा मुख्य व्हॉट्सअॅप चॅटबॉट (८९९९२२८९९९), संकेतस्थळ आणि १९१६ हेल्पलाइनद्वारेही तक्रारी नोंदवता येईल. मुख्य चॅटबॉटवर 'खड्डा' किंवा 'ख' असा संदेश पाठवून खड्डयांची, तर 'मॅनहोल' किंवा 'म' असा संदेश पाठवून तक्रार नोंदवता येते तसेच छायाचित्र आवश्यक असलेल्या तक्रारींसाठी जिओ-टॅग केलेले छायाचित्र अपलोड करण्यासाठी लिंकही पाठवण्यात येते. महानगरपालिकेने केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in