

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विधी खात्यातील कामकाज अधिक कार्यक्षम आणि सुसूत्र करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने आस्थापना आकृतिबंधात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांतर्गत विधी खात्यातील विविध संवर्गांतील तब्बल ३५ पदे कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहेत. त्याचवेळी नव्या कामकाजाच्या गरजेनुसार २५ पदांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे विधी खात्यातील पदरचनेची पुनर्रचना होणार आहे.
महापालिकेच्या विधी खात्याच्या आस्थापनेवर कायदा अधिकारी, वरिष्ठ विधी सहायक, लिपिक, हमाल आदी विविध संवर्गांतील एकूण ३५५ पदे आहेत. मात्र, या पदरचनेत सुसूत्रता आणताना काही पदांची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनावश्यक पदे कमी करून आवश्यक पदांची नव्याने निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
रद्द करण्यात येणाऱ्या ३५ पदांमध्ये कनिष्ठ कायदा अधिकारी (४), प्रमुख चौकशी अधिकारी (१), चौकशी अधिकारी (५), वरिष्ठ विधी सहायक (७), अधीक्षक न्यायालय (२), अधीक्षक हस्तांतरण (१), वरिष्ठ न्यायालयीन लिपिक (१), लघुलेखक उच्च श्रेणी (२), लघुलेखक कनिष्ठ श्रेणी (१०) आणि फलक परिचर (२) या पदांचा समावेश आहे.
दुसरीकडे, विधी खात्याच्या कामकाजासाठी २५ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये सहायक कायदा अधिकारी (७), सहायक कायदा अधिकारी श्रेणी-२ (२), मुख्य लिपिक (१), कार्यकारी सहायक (१२), नाईक (२) आणि उपकायदा अधिकारी (१) या पदांचा समावेश आहे. याशिवाय सहायक कायदा अधिकारी संवर्गातील ३२ आणि सहायक कायदा अधिकारी श्रेणी-२ संवर्गातील २४ पदे अनुसूचीवर घेण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे.