

मुंबई : मुंबई महापालिकेच्या बाजार विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष हेतल गाला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाजार विभागाचा कारभार चालवण्यासाठी आवश्यक अधिकारी-कर्मचारीच उपलब्ध नसतील, तर केवळ कागदोपत्री सुरू असलेली बाजार समिती बरखास्त केलेलीच बरी, असा संतप्त इशारा हेतल गाला यांनी प्रशासनाला दिला आहे. बाजार विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
१६ जुलै २०२६ रोजी प्रशासनाला अधिकृत पत्र देऊनही गेल्या चार महिन्यांत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे हेतल गाला आपल्या अंतिम स्मरणपत्रात नमूद केले आहे. मुंबईतील ९२ महापालिका बाजारांसह विकासकामांतून महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या ॲकॅमोडेशन रिझर्व्हेशन (एआर) बाजारांची जबाबदारी बाजार विभागावर आहे. मात्र, या बाजारांचे व्यवस्थापन, देखभाल, दुरुस्ती आणि परवानाधारक विक्रेत्यांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळच विभागाकडे नसल्याने कामकाज ठप्प होण्याची वेळ आली आहे.
मनुष्यबळाअभावी बाजारांमधील स्वच्छता, नागरी सुविधा, देखभाल आणि प्रशासकीय कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याबाबत प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी गाला यांनी केली आहे. नागरिक आणि विक्रेत्यांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.
एवढी पदे रिक्त
बाजार निरीक्षकांच्या मंजूर पदांपैकी तब्बल ८८ पदे रिक्त आहेत. संपूर्ण मुंबईतील ९२ हून अधिक बाजारांवर देखरेख ठेवण्यासाठी सध्या केवळ आठ ते नऊ बाजार निरीक्षक कार्यरत आहेत. त्यातील सहा निरीक्षक येत्या काही महिन्यांत निवृत्त होणार असल्याने भविष्यात केवळ तीन ते चार निरीक्षकांवर संपूर्ण मुंबईच्या बाजारांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारांमधील अनधिकृत बाबींवर नियंत्रण ठेवणे आणि परवानाधारक विक्रेत्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे कठीण होणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजार निरीक्षक, कनिष्ठ अभियंते, देखभाल व वास्तुविशारद विभागातील उपअभियंते, सहाय्यक अभियंते, कार्यकारी अभियंता आणि उपअधीक्षक बाजार यांची रिक्त पदे प्राधान्याने भरून तातडीने नियुक्ती आदेश काढावेत, अशी मागणी हेतल गाला यांनी केली आहे.