भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी शिंदेसेना आग्रही; मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९ तर शिंदेसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेनेचा मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील सर्वोच्च महापौरपद घ्यायचे की पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेले स्थायी समिती यावरुन भाजप व शिंदेसेनेचे घोड अडलंय, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी शिंदेसेना आग्रही; मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार
PTI Image
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी महापौर कोणाचा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम व शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे दिल्लीत डेरेदाखल झाल्याने मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिंदेसेना महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९ तर शिंदेसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप व शिवसेनेचा मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील सर्वोच्च महापौरपद घ्यायचे की पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेले स्थायी समिती यावरुन भाजप व शिंदेसेनेचे घोड अडलंय, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

महापौरपदामुळे मुंबईचा प्रथम नागरिक असल्याचा बहुमान मिळतो. मात्र महापौरांकडे फारसे अधिकार नाहीत, तर मुंबई महापालिकेच्या प्रकल्पांना स्थायी समितीत मंजुरी दिली जाते. त्यामुळे शिंदे सेना स्थायी समितीसाठी आग्रही असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, अद्याप कुठल्याच गोष्टींबाबत चर्चा झालेली नाही. पुढील तीन ते चार दिवसांत चित्र स्पष्ट होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृत नावाची घोषणा करतील, असे शिंदे सेनेचे युवा सरचिटणीस नगरसेवक अमेय घोळे यांनी 'दैनिक नवशक्ति' शी बोलताना सांगितले.

पहिल्यांदाच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून मुंबई काबीज करणाऱ्या भाजपसाठी महापौराची निवड डोकेदुखी ठरली आहे. महापौर भाजपचाच अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र, भाजपला निवडणुकीत ८९ जागाच जिंकता आल्या. त्यामुळे ११४ हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज लागणार आहे. भाजपची हीच अडचण ओळखून एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद पहिल्या अडीच वर्षांसाठी आपल्याला मिळावे आणि स्थायी व इतर समित्यांमध्ये योग्य वाटा मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. भाजप आणि शिंदे सेनेत यावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदाचा वाद दिल्ली दरबारी पोहोचला असून केंद्रीय नेतृत्व महापौर कोण हे ठरवणार आहे.

दोन दिवसांत कोकण आयुक्तांकडे नोंदणी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेल्या नगरसेवक पळवण्याचा धोका लक्षात घेत नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील हाॅटेल ताजमध्ये सलग चार दिवस ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी २९ नगरसेवक स्वतःच्या घरी गेले आहेत. पक्ष नोंदणीसाठी पुढील दोन दिवसांत कोकण आयुक्तांकडे सगळे नगरसेवक जाणार असल्याचे अमेय घोळे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची प्रमाणपत्रे पक्षाच्या ताब्यात?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांवर पक्षाचा अद्यापही विश्वास नसल्याचे दिसते. या नगरसेवकांनी पक्षाला दगा फटका करू नये यासाठी विजयी झालेल्या उमेदवारांची निवडणूक प्रमाणपत्रे पक्षाच्या ताब्यात घेण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in