Mumbai : गणेशोत्सवात BMC राबवणार ‘मोदक महोत्सव’; बचत गटातील महिलांना देणार प्रशिक्षण; २१ ऑगस्टपर्यंत संकल्पना समोर येणार

मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गुढीपाडव्यानिमित्त अनेक मुंबईकरांनी महिला बचत गटांच्या पुरणपोळ्यांची चव चाखली, तर आता गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांना महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या मोदकाची चव चाखता येणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पूनम पोळ/ मुंबई

मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गुढीपाडव्यानिमित्त अनेक मुंबईकरांनी महिला बचत गटांच्या पुरणपोळ्यांची चव चाखली, तर आता गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांना महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या मोदकाची चव चाखता येणार आहे. यासाठी पालिकेच्या नियोजन विभागाच्या वतीने काम सुरू असून येत्या २१ ऑगस्टपर्यंत या महोत्सवाविषयीची संकल्पना मुंबईकरांसमोर आणण्याचा पालिकेचा मानस असल्याची माहिती नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

गरजू व मेहनती महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. महिलांच्या या बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्याअंतर्गत पालिकेच्या सहाय्याने महिला बचत गटांनी यापूर्वी यशस्वीरीत्या पुरणपोळी महोत्सव राबवला. त्याच अनुषंगाने, पालिकेने आता मोदक महोत्सव राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेच्या नियोजन विभागामार्फत या कार्यक्रमाचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांच्या मागणीसाठी संकेतस्थळ निर्मितीचे काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर, बचत गटाच्या महिलांशी चर्चा करून मोदकाचे वजन, आकार यावर चर्चा सुरू आहे. या सर्व बाबींचे नियोजन ठरल्यानंतर पालिकेच्या वतीने महिला बचत गटाला प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जांभेकर यांनी दिली.

महिलांना प्रशिक्षण

पालिकेच्या नियोजन विभागाच्या वतीने या उपक्रमासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. यासाठी संबंधित बचत गटातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मागणी कशा पद्धतीने नोंद करून ठेवायची, त्यानंतर दर्जा आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळून स्वादिष्ट मोदक ग्राहकांना कसे घरपोच पाठवायचे, याबाबतही नियोजन विभाग बचत गटातील महिलांना नि:शुल्क मार्गदर्शन करणार आहे. तसेच, बाजारात मागणी असल्यास त्या पद्धतीने पुरवठा कसा करावा, याचेही प्रशिक्षण बचत गटांना देण्यात येणार आहे.

गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी महोत्सव राबवला होता. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर, पालिका आता मोदक महोत्सव राबवणार आहे. यासाठी, पालिकेकडून बचतगट निवडण्याचे काम सुरू आहे. इच्छुक बचतगटांची माहिती घेऊन ते किती प्रमाणात मोदक बनवू शकतील, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच, याबाबत डिजिटल माध्यम प्रतिनिधींसोबत संकेतस्थळावर काम सुरू असून यासाठी पिनकोड मॅपिंग करण्यात येणार आहे. येत्या २१ ऑगस्टपर्यंत मोदक महोत्सव लोकांच्या भेटीस आणण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. - प्राची जांभेकर, नियोजन संचालक, मुंबई महानगरपालिका

logo
marathi.freepressjournal.in