Mumbai : पालिकेच्या भूखंडांची अदलाबदल; मुलुंडच्या वीर संभाजी राजे मैदानासाठी नवघर रोडवरून प्रवेश

मुलुंड पूर्व येथील वीर संभाजी राजे मैदानाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने मुंबई पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'टी' विभागातील पालिकेच्या मालकीच्या ११९.९२ चौरस मीटर भूखंडाची मे. मुलुंड जिमखाना यांच्या मालकीच्या १२०.४२ चौरस मीटर भूखंडासोबत अदलाबदल करण्यात येणार आहे.
Mumbai : पालिकेच्या भूखंडांची अदलाबदल; मुलुंडच्या वीर संभाजी राजे मैदानासाठी नवघर रोडवरून प्रवेश
Mumbai : पालिकेच्या भूखंडांची अदलाबदल; मुलुंडच्या वीर संभाजी राजे मैदानासाठी नवघर रोडवरून प्रवेश
Published on: 

मुंबई : मुलुंड पूर्व येथील वीर संभाजी राजे मैदानाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने मुंबई पालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'टी' विभागातील पालिकेच्या मालकीच्या ११९.९२ चौरस मीटर भूखंडाची मे. मुलुंड जिमखाना यांच्या मालकीच्या १२०.४२ चौरस मीटर भूखंडासोबत अदलाबदल करण्यात येणार आहे.

या अदलाबदलीमुळे पालिकेला ०.५० चौरस मीटर अतिरिक्त जमीन मिळणार असून, वीर संभाजी राजे मैदानात नवघर रोडवरून थेट प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुलुंड पूर्व येथील न.भू.क्र. ७१५/बी/१ हा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. तर त्याला लागून असलेले न.भू.क्र. ७१३/सी, ७१३/डी आणि ७१४/१ हे भूखंड मे. मुलुंड जिमखाना यांच्या मालकीचे आहेत. विकास आराखडा २०३४ नुसार या परिसरातील भूखंड क्लब-व्यायामशाळा या सार्वजनिक सुविधेच्या आरक्षणाने बाधित आहेत.

जिमखान्याच्या विकासाचे योग्य नियोजन करता यावे, यासाठी पालिकेच्या मालकीच्या ११९.९२ चौ.मी. जागेची अदलाबदल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याबदल्यात जिमखान्याने स्वतःच्या मालकीची १२०.४२ चौ.मी. जागा पालिकेला देण्याची तयारी दर्शवली आहे.

अधिकृत करारनामा झाला नाही

संबंधित पालिकेचा भूखंड सन १९८८ मध्ये मे. मुलुंड जिमखाना यांना विकसित करून त्याचे परिरक्षण करण्याच्या अटीवर नाममात्र वार्षिक भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. त्यासाठी ६०३ रुपये आकारण्यात आले होते. मात्र, या व्यवहारासंदर्भात पालिका आणि जिमखाना यांच्यात अधिकृत करारनामा झालेला नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

जागेचा वापर क्लब- व्यायामशाळेसाठीच

या अदलाबदलीसाठी उद्यान विभागाने १५ अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार जिमखान्याला स्वतःच्या खर्चाने भूखंड विकसित करावा लागणार असून, जमिनीचे मालकी हक्क तपासणे, पोटविभाजन करणे, करारनाम्याची नोंदणी, मुद्रांक शुल्क आणि महसूल अभिलेखात पालिकेचे नाव नोंदवण्याचा खर्चही जिमखान्यालाच करावा लागणार आहे तसेच पालिकेला मिळणारी जमीन भारमुक्त असणे बंधनकारक आहे. या जागेचा वापर क्लब-व्यायामशाळेसाठीच करण्याची अटही घालण्यात आली आहे.

उद्यान विभागाचा सविस्तर अहवाल

सुधार समितीच्या २७ मे २०२६ रोजीच्या बैठकीत या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. जमिनीच्या अदलाबदलीतून पालिकेला नेमका काय फायदा होणार, असा सवाल करत प्रस्ताव फेरविचारासाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. त्यावर उद्यान विभागाने १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सविस्तर अहवाल सादर केला आहे.

आसनव्यवस्था, मैदानापर्यंत पदपथ उभारण्याची सुविधा

वीर संभाजी राजे मैदानाच्या दक्षिण बाजूला रस्ता आणि प्रवेशद्वार नसल्यामुळे नागरिकांना मैदानात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो.

स्थानिक नागरिकांनीही नवघर रोडवरून मैदानात जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. भूखंड अदलाबदलीनंतर नवघर रोडच्या बाजूने प्रवेशद्वार, सुरक्षारक्षक चौकी, नागरिकांसाठी आसनव्यवस्था आणि मैदानापर्यंत पदपथ उभारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)