Mumbai : चांदीपुरा विषाणूचा धोका; पालिका ‘अलर्ट’, कस्तुरबा रुग्णालयात १० बेड्स आरक्षित

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका ‘अलर्ट’ मोडवर आहे.
Mumbai : चांदीपुरा विषाणूचा धोका; पालिका ‘अलर्ट’, कस्तुरबा रुग्णालयात १० बेड्स आरक्षित
Mumbai : चांदीपुरा विषाणूचा धोका; पालिका ‘अलर्ट’, कस्तुरबा रुग्णालयात १० बेड्स आरक्षित 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका ‘अलर्ट’ मोडवर आहे. संभाव्य रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी कस्तुरबा रुग्णालयात १० खाटांचा स्वतंत्र विलगीकरण (आयसोलेशन) कक्ष तयार करण्यात येणार आहे तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, चांदीपुरा विषाणूविरोधात त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, कृती आराखडा तयार करा, अशी सूचना विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला केली आहे.

सध्या मुंबईत चांदीपुरा विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, गुजरातमध्ये या विषाणूचा उद्रेक सुरू असल्याने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य शासन, केंद्र शासन तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवत असून शासकीय व खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

'ही' आहेत लक्षणे

चांदीपुरा विषाणू प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. या आजारात अचानक ताप, उलट्या, आकडी, गुंगी आणि मेंदूशी संबंधित गंभीर लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे संशयित रुग्णांचे लवकर निदान आणि तातडीने उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालिकेने नमूद केले आहे.

मोहीम राबवावी

विशेषतः बालकांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य यंत्रणा उच्चस्तरीय सतर्कतेवर ठेवावी, सर्व महानगरपालिका रुग्णालयांना आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, रुग्णांचे तातडीने निदान व उपचार करण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करावी तसेच जनजागृतीसाठी व्यापक माहिती अभियान राबवावे, अशा मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in