Mumbai : पालिका अभियंत्यांच्या ऑनलाइन बदल्यांचा उतारा! महिनाभरात बदलीच्या ठिकाणी रूजू व्हा

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये होणारे कथित गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे...
Mumbai : पालिका अभियंत्यांच्या ऑनलाइन बदल्यांचा उतारा! महिनाभरात बदलीच्या ठिकाणी रूजू व्हा
Mumbai : पालिका अभियंत्यांच्या ऑनलाइन बदल्यांचा उतारा! महिनाभरात बदलीच्या ठिकाणी रूजू व्हा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये होणारे कथित गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्थापत्य आणि अभियांत्रिकी विभागातील सुमारे ८५० अभियंत्यांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर एका महिन्यात नवीन ठिकाणी रूजू न झाल्यास संबंधित अभियंत्यांचा पगार थांबवण्यात येणार आहे. तसेच संबंधित विभागातील एचओडीने बदलीचे आदेश दिले नाही तर अधिकारी व विभागप्रमुखांचाही महिन्याचा पगार रोखणार, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक अभियंते तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे काही विभागांमध्ये विशिष्ट अधिकाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याचे आरोप होत आहेत. बदली टाळण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बदल्यांमधील मानवी हस्तक्षेप कमी करून प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. या प्रक्रियेत एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या स्थापत्य आणि अभियांत्रिकी विभागातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंता या संवर्गांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

३५० जेईची नवीन भरती!

मुंबई महापालिकेत आता ३५० ज्युनिअर इंजिनिअरची भरती पुढील दोन ते तीन महिन्यांत करण्यात येणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले.

वशिलेबाजीला आळा घालण्याचा प्रयत्न

आयुक्तांच्या निर्देशानुसार अभियंत्यांची वैयक्तिक माहिती आणि सेवाविषयक संपूर्ण तपशील ऑनलाइन प्रणालीमध्ये संकलित करण्यात आला आहे. नगर अभियंता विभागाकडून या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. संगणकीय पद्धतीने बदल्या केल्यास वैयक्तिक शिफारशी, वशिलेबाजी आणि दबावाचा प्रभाव कमी होण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.

अधिकारीही कारवाईच्या कक्षेत बदली झालेल्या कर्मचाऱ्याला जुन्या विभागातून कार्यमुक्त करण्यास जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या अधिकारी आणि विभागप्रमुखांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in