मुंबई महापालिका रोखे जारी करण्याच्या तयारीत

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेने (बीएमसी) पहिल्यांदाच महापालिका रोखे (म्युनिसिपल बॉण्ड) जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. या रोख्यांसाठी बाजार नियामक सेबीकडे लवकरच कागदपत्रे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी दिली.
मुंबई महापालिका रोखे जारी करण्याच्या तयारीत
मुंबई महापालिका रोखे जारी करण्याच्या तयारीत
Published on: 

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेने (बीएमसी) पहिल्यांदाच महापालिका रोखे (म्युनिसिपल बॉण्ड) जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. या रोख्यांसाठी बाजार नियामक सेबीकडे लवकरच कागदपत्रे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी दिली.

प्रस्तावित रोखे विक्रीतून किरकोळ गुंतवणूकदारांसह संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही सहभागी करून घेण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. सध्या सर्वसाधारण रोखे जारी करण्याची योजना असून भविष्यात पायाभूत सुविधांसाठी हरित, जलविषयक आणि सामाजिक रोख्यांचाही विचार केला जाऊ शकतो, असे भिडे यांनी सांगितले.

‘ट्रस्ट ग्रुप’च्या सहाव्या इंडिया डेट कॅपिटल मार्केट समिटमध्ये भिडे म्हणाल्या की, रोखे जारी करण्यासाठी आवश्यक बाजार मध्यस्थांची व्यवस्था करण्यात आली असून सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रोख्यांची रक्कम आणि बाजारात आणण्याची तारीख याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. मात्र, सप्टेंबरमध्ये महापालिका सुमारे ९,५०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले होते.

महापालिकेचे वार्षिक बजेट सुमारे ८० हजार कोटी रुपये असून त्यापैकी ४८ हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च केले जात आहेत. वाढत्या प्रकल्पांसाठी निधीची गरज लक्षात घेऊन रोखे, संस्थात्मक कर्ज, सार्वजनिक-खासगी भागीदारी आणि बहुपक्षीय संस्थांकडून निधी मिळवण्याचे पर्याय तपासले जात आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)