

गिरीश चित्रे / मुंबई
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील पार्किंगची क्षमता ५० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित ५० टक्के जागा फाईव्ह स्टार हॉटेल व्यावसायिकांना उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे पार्किंगची क्षमता ५० टक्के करण्यासाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये ( डीसीपीआर) बदल करण्यात येणार आहे.
देशविदेशात ये-जा करण्यासाठी हजारो लोक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतात. यातील बहुतांश प्रवासी ओल उबेरचा वापर करतात. त्यामुळे विमानतळ परिसरातील पार्किंगची जागा ५० टक्के रिकामीच असते.
पन्नास टक्के जागा पडून असल्याचे कारण पुढे करून इथली पार्किंगची क्षमता ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावी , अशी मागणी फाईव्ह स्टार हॉटेल व्यावसायिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनानेही त्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. परिणामी ही अतिरिक्त जागा हॉटेल व्यवसायिकांना उपलब्ध होणार आहे.
हॉटेल मालकांच्या सोयीच्या या प्रस्तावासाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बदल करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हॉटेल्स इमारती विकसित करण्यासाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील विनियम ३३ (४) व ४४ अंतर्गत स्टार श्रेणीतील हॉटेल्ससाठी, विशेषतः विमानतळाच्या ५ कि. मी. प्रभाव क्षेत्रात सुधारित वाहनतळ निकष निर्धारित करण्याबाबत प्रस्तावित आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने तयार करून सुधार समितीत मंजुरीसाठी सादर केला आहे. सुधार समितीच्या मंजुरीनंतर तो पालिका सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. तिथून तो राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठविला जाईल. नगरविकास विभागाच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी होईल, असे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
उपलब्ध जागा का सोडून द्यायची?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सरासरी १,५०,००० पेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी या विमानतळाने एका दिवसात तर तब्बल १,७५,९२५ प्रवाशांची विक्रमी नोंद केली होती. हे विमानतळ वार्षिक ५.५ कोटींहून अधिक प्रवाशांची हाताळणी करते आणि येथे दररोज सरासरी ९८० विमानांची ये-जा होते. येत्या काळात विमानांची व प्रवाशांची संख्या वाढतच जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विमानतळ परिसरात सध्या उपलब्ध असलेली पार्किंगची जागा हॉटेलवाल्यांना देऊन टाकण्याच्या निर्णयाबाबत जाणकारांनी नापसंती व्यक्त केली आहे. एकदा गेलेली ही जागा परत मिळणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.