मुंबई : बॅनर्समुक्त मुंबई यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्वतः ग्राऊंड झीरोवर उतरून पोस्टर्स, बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स मोहीम हाती घेतली आहे. मुंबईचे विद्रुपी करणारे फ्लेक्स हटवा, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर फ्लेक्समुक्त मुंबई यासाठी पालिका प्रशासनाने बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. ८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १६ हजार १५३ अनधिकृत बॅनर, फलक, पोस्टर्स आणि इतर जाहिराती हटवण्यात आल्या आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत जाहिराती हटवूनही प्रत्यक्ष गुन्हे दाखल करण्याची संख्या अवघी १७ असल्याने कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या परवाना विभागाच्या अहवालानुसार, या कालावधीत १० हजार २५० बॅनर हटवण्यात आले. यामध्ये २ हजार ८४५ राजकीय, १ हजार ३७२ व्यावसायिक आणि ६ हजार ३३ धार्मिक व सामाजिक बॅनरचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, एकूण ४ हजार ९३२ जाहिरात फलक (बोर्ड) हटवण्यात आले. यामध्ये १ हजार ९४५ राजकीय, ४५० व्यावसायिक आणि २ हजार ५३७ धार्मिक व सामाजिक फलकांचा समावेश आहे, तर ७१६ पोस्टर्स हटवण्यात आली असून, त्यात १५७ राजकीय, २२ व्यावसायिक आणि ५३७ धार्मिक व सामाजिक पोस्टर्स आहेत. तसेच भिंती विद्रूप केल्याच्या १८ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून, २३७ झेंडेही हटवण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण १६ हजार १५३ अनधिकृत जाहिरात साहित्य हटवण्यात आले आहे.
मुंबईचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी 'शाडू बाप्पा दहा दिवस, फ्लेक्समुक्त मुंबई तीनशे पासष्ट दिवस' ही विशेष मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेंतर्गत अनुज्ञापन, परिरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन विभागांसह संबंधित विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण कमी !
या कारवाईदरम्यान १४७ प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांना पत्रे पाठवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ १७ एफआयआर दाखल करण्यात आल्याची नोंद अहवालात आहे.
मुद्रक, जाहिरात एजन्सींवरही कारवाई
नागरिकांकडून अनधिकृत जाहिरात फलकांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ते तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच भविष्यात अधिकृत जाहिरात फलकांची वैधता सहज तपासता यावी, यासाठी त्यांच्यावर क्यूआर कोड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विनापरवाना जाहिरात फलक छापणाऱ्या मुद्रक आणि जाहिरात एजन्सींवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तीन महिने कारावास किंवा दंडाची शिक्षा !
मुंबईचे सार्वजनिक स्वरूप व स्वच्छता टिकवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर, पोस्टर्स किंवा जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या कायद्यानुसार संबंधित तरतुदींतर्गत तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.