मुंबईत ३,८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटवल्या; ५४२ ठिकाणी कार्यवाही प्रगतिपथावर

मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना घडल्यानंतर, सार्वजनिक व खासगी क्षेत्र मिळून ३ हजार ८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटवणे, वृक्ष छाटणीची कामे महापालिकेच्या उद्यान विभागाने पूर्ण केली आहेत.
मुंबईत ३,८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटवल्या; ५४२ ठिकाणी कार्यवाही प्रगतिपथावर
मुंबईत ३,८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटवल्या; ५४२ ठिकाणी कार्यवाही प्रगतिपथावरसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटना घडल्यानंतर, सार्वजनिक व खासगी क्षेत्र मिळून ३ हजार ८४१ ठिकाणी झाडे, फांद्या हटवणे, वृक्ष छाटणीची कामे महापालिकेच्या उद्यान विभागाने पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उर्वरित ५४२ ठिकाणची कार्यवाही देखील प्रगतिपथावर आहे.

३० जून ते ८ जुलैदरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस झाला. सतत बरसलेल्या पावसामुळे २२ जून ते १७ जुलै या कालावधीत ९०२ झाडे उन्मळून पडली. तर १,२५१ फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उद्यान विभागाने उन्मळून पडलेली झाडे व झाडांच्या फांद्या हटवण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

उद्यान विभागाने महानगरपालिकेच्या तसेच खासगी जागांवरील घटनांचा स्वतंत्र आढावा घेत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही केली. काही ठिकाणी झाडे किंवा फांद्या हटविण्याचे काम संबंधित जागेची परिस्थिती, हवामान, सुरक्षितता आणि आवश्यक परवानग्या यांमुळे टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया सुरू आहे.

झाडे पडण्याचा धोका असल्यास १९१६ वर संपर्क साधा !

पावसाच्या वेळी अथवा सोसाट्याचा वारा वाहत असताना नागरिकांनी झाडांखाली थांबू नये. तसेच, कुठे झाड पडलेले आढळल्यास, झाड कोसळण्याचा धोका जाणवत असल्यास किंवा झाडाची फांदी पडलेली असल्यास नागरिकांनी तातडीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in