मुंबईत पुन्हा रस्त्यांची धुलाई; २१३ टँकरद्वारे ६७७ किमी रस्त्यांची स्वच्छता

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी रस्त्यांची पाण्याने धुलाई करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली मुंबई पालिकेने सुरू केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर होण्याच्या शक्यतेवरून ऑक्टोबर महिन्यात स्थायी समितीने टँकर भाड्याने घेण्याचा प्रस्ताव फेटाळला होता.
मुंबईत पुन्हा रस्त्यांची धुलाई; २१३ टँकरद्वारे ६७७ किमी रस्त्यांची स्वच्छता
मुंबईत पुन्हा रस्त्यांची धुलाई; २१३ टँकरद्वारे ६७७ किमी रस्त्यांची स्वच्छताप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी रस्त्यांची पाण्याने धुलाई करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली मुंबई पालिकेने सुरू केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर होण्याच्या शक्यतेवरून ऑक्टोबर महिन्यात स्थायी समितीने टँकर भाड्याने घेण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, रस्ते धुलाईसाठी पिण्याचे पाणी नव्हे, तर प्रक्रिया केलेले सांडपाणी, बोअरवेल आणि विहिरीतील पाणी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुधारित प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करणार आहे. त्यामुळे रस्ते धुलाईची रखडलेली मोहीम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता गेल्या काही वर्षांपासून सातत्याने खालावत आहे. बांधकामे, विकासकामे आणि वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ साचत असून त्याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. धूळ प्रदूषण रोखण्यात अपयश येत असल्याबद्दल न्यायालयानेही पालिकेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या.

प्रस्ताव फेटाळल्यामुळे मोहिमेला ब्रेक

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, मुंबईत लागू असलेली १० टक्के पाणीकपात आणि अनेक भागांत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे रस्ते धुलाईसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरण्याच्या निर्णयावर स्थायी समिती सदस्यांनी आक्षेप घेतला. रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त करत काँग्रेससह विविध पक्षांच्या सदस्यांनी प्रस्तावाला विरोध केला. अखेर ऑक्टोबरमध्ये हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला ब्रेक लागला होता.

समितीच्या मंजुरीवर लक्ष

आता महापालिकेने पाण्याच्या स्रोताबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. रस्ते धुलाईसाठी केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणी, बोअरवेल आणि विहिरीतील पाण्याचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे तसेच कंत्राटदारांनी पाण्याचा पुरवठा कोणत्या स्रोतामधून करणार, याचा तपशील निविदेसोबत सादर करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नव्या अटींसह सादर झालेल्या या प्रस्तावाला स्थायी समिती मंजुरी देते का, याकडे लक्ष लागले आहे.

दोन ते दहा लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर करणार

ही मोहीम सुरू ठेवण्यासाठी यंदाही महापालिकेने १५० दिवसांच्या कालावधीसाठी २१३ पाण्याचे टैंकर भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांची निवड करण्यात आली. या माध्यमातून मुंबईतील ३७७ सार्वजनिक रस्त्यांवरील सुमारे ६७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दररोज धुलाई करण्याचे नियोजन होते. यासाठी दोन हजार, पाच हजार आणि दहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर करण्यात येणार होता.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)