मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले. तीन नगरसेवक निवडून आले तर त्यांना गटनेते पद, कार्यालय उपलब्ध करून देण्यात येते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र काही वर्षांपूर्वी अपक्ष दोन नगरसेवकांना कार्यालय दिल्याची आठवण सपाच्या नगरसेवकांनी करून दिली. अखेर पालिका प्रशासनाने सपाच्या दोन नगरसेवकांसाठी वातानुकूलित कार्यालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून लवकरच त्यांना ते देण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार पक्ष कार्यालये दिली जातात. त्यामुळे सध्या सर्वाधिक मोठे कार्यालय भाजपकडे असून दुसऱ्या क्रमांकाचे कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर तिसऱ्या क्रमांकाचे कार्यालय शिवसेना शिंदे गटाकडे आहे. काँग्रेसलाही मोठे कार्यालय मिळाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एआयएमआयएम यांनाही त्यांच्या नगरसेवकांच्या संख्याबळानुसार छोटी कार्यालये देण्यात आली आहेत. पण समाजवादी पार्टीचे अवघे दोन नगरसेवक निवडून आल्याने कार्यालय मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात होते.
समाजवादी पार्टीने आपल्याला कार्यालय मिळावे, अशी विनंती महापालिका सचिव विभागाकडे केली. परंतु महापालिका मुख्यालयात जागा उपलब्ध नसल्यामुळे कार्यालय देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. अखेर समाजवादी पार्टीने काही वर्षांपूर्वी दोन अपक्ष नगरसेवकांना दिलेल्या कार्यालयाची आठवण करून देत, आपल्यालाही कार्यालय मिळायलाच हवे, असे महापालिका प्रशासनाला सांगितले. अखेर सचिव विभागाने समाजवादी पार्टीला कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या समोरील पेंट्री कारची सुमारे २०० चौरस फुटाची जागा सपाला देण्यात आली आहे. या जागेत आता नूतनीकरणाचे काम सुरू असून पुढील आठवड्यात हे कार्यालय समाजवादी पार्टीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे दोन नगरसेवक असलेल्या पक्षाला महापालिका मुख्यालयात आता आपले कार्यालय थाटता येणार आहे.