Mumbai : पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; BMC करणार ९० कोटी खर्च

बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. यासह इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅबही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन एकूण ९० कोटी रुपये खर्च करणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक साहित्य मोफत वितरीत करण्याचा उपक्रम राबवित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दफ्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदींचा समावेश आहे. बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले जाणार आहे. सर्व शाळांमध्ये हे साहित्य पोहोचविण्यात येत आहे. शाळानिहाय वाटपाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तके राज्य शासनाकडून देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना देणार टॅब

इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीच्या अभ्यासासह आधुनिक पद्धतीचाही सराव व्हावा, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शालेय वेळेत टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या टॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. टॅब कसा हाताळावा, त्याचा अभ्यासात उपयोग कसा करावा, याबाबत शिक्षकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.

logo
marathi.freepressjournal.in