

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि जागतिक शैक्षणिक क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने विशेष शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था), भारतातील विविध शैक्षणिक स्थळे तसेच सिंगापूर येथे नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात ३५ विद्यार्थी अन् पाच शिक्षकांचा समावेश करण्यात येणार असून या सहलींचे नियोजन, संयोजन व आयोजनासाठी एजन्सीची निवड केली जाणार आहे. यासाठी नामांकित बोलीदारांकडून ई-निविदेद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत.
मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत असून क्रीडा क्षेत्रात ही आपले नाव कोरले आहे. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जात आहे. मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात आवड असल्याचे निदर्शनाला आले आहे. विज्ञान परीक्षा स्पर्धेत चांगले गुणही मिळवलेले विद्यार्थी आहेत.
अनुभव, प्रत्यक्ष माहिती मिळणार
सिंगापूर येथे शैक्षणिक सहल आयोजित केल्यास प्रतिविद्यार्थी सुमारे दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तर बंगळूर येथील इस्रोला भेट देण्यासाठी प्रतिविद्यार्थी ४० ते ५० हजार खर्च येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशातील शैक्षणिक अनुभव आणि देशातील अवकाश संशोधन संस्थेची प्रत्यक्ष माहिती, असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध होणार आहेत.