

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आता रोबोटिक्स, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासह त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या ५० शिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी आयआयटी मुंबई येथे अभ्यास दौरा केला.
या दौऱ्यात शिक्षकांना रोबोटिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. कवी आर्य आणि प्रा. डॉ. शिवराम कल्याणकृष्णन यांनी 'ई-यंत्र' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांना नवनवीन संधी
या प्रकल्पाच्या माध्यमातून पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, जिद्द आणि उपक्रमशीलता आहे. या गुणांना योग्य दिशा दिल्यास भविष्यात ते स्वतःचे स्टार्टअप सुरू करू शकतील, असा विश्वास प्रा. कवी आर्य यांनी व्यक्त केला. 'ई-यंत्र'सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण अधिक आनंददायी करण्याबाबत भर
या अभ्यास दौऱ्यात शिक्षकांना ड्रोन, अल्फाबॉट लाईन फॉलोइंग यांसारख्या रोबोटिक्स प्रकल्पांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली तसेच 'लॅब-इन-अ-बॉक्स'च्या माध्यमातून शाळांमध्ये कमी खर्चात आणि सोप्या पद्धतीने आधुनिक प्रयोगशाळा कशी उभारता येईल, याचे मॉडेल सादर करण्यात आले. याशिवाय आयआयटीच्या तज्ज्ञांसोबत झालेल्या 'ओपन हाऊस' चर्चासत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आनंददायी करण्याबाबत चर्चा झाली.
आयआयटीचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार
आयआयटी मुंबई आणि पालिका यांच्यातील समन्वयातून आगामी काळात रोबोटिक्स, कोडिंग आणि प्रात्यक्षिक शिक्षणाचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येणार आहेत. आयआयटीमधील प्राध्यापक पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, नियमित अभ्यासक्रमासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.