Mumbai : पालिका सुरक्षा रामभरोसे; ४,०७६ मंजूर पदांपैकी २,३७९ रिक्त; अवघे १,६९७ सुरक्षारक्षक कार्यरत

मुंबई महापालिका मुख्यालय, रुग्णालये, उद्याने, मैदाने आणि विविध नागरी मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा विभागात मनुष्यबळाचा मोठा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिकासंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालय, रुग्णालये, उद्याने, मैदाने आणि विविध नागरी मालमत्तांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा विभागात मनुष्यबळाचा मोठा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ४,०७६ मंजूर पदांपैकी २,३७९ पदे रिक्त असून अवघे १,६९७ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे पालिकेच्या कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत असून अनेक ठिकाणी कंत्राटी सुरक्षारक्षक आणि केअर टेकरच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचा भार सांभाळला जात आहे. कुर्ला पश्चिमेतील प्रमोद महाजन उद्यानात तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर उद्याने व पालिका मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पालिकेच्या सुरक्षारक्षकांना मुख्यालय, विभागीय कार्यालये, रुग्णालये व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येते. मुख्यालयातील प्रवेशद्वारांवर प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत असतात. याशिवाय महापौर, उपमहापौर, समिती अध्यक्ष, आयुक्त, सहआयुक्त आणि उपायुक्त यांच्या सुरक्षेची जबाबदारीही सुरक्षा विभागावर आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक कर्मचाऱ्यांना दोन ते तीन पाळ्यांमध्ये सातत्याने काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.

सुरक्षारक्षकांच्या भरतीला मंजुरी

२०१४ पासून महापालिकेत सुरक्षारक्षकांची नियमित भरती झालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून ९०० हून अधिक सुरक्षारक्षकांच्या भरतीला मंजुरी मिळाली असली तरी आरक्षणातील बदल, भरती प्रक्रिया आणि आकृतिबंध तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे भरती रखडली आहे. परिणामी, एमएसएफ आणि खासगी सुरक्षारक्षकांची मदत घेतली जात आहे.

दालनाबाहेर सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

महापौर रितू तावडे यांच्या सुरक्षेसाठी पूर्वी तीन पाळ्यांमध्ये तीन सुरक्षारक्षक तैनात होते. सुरक्षेत वाढ करण्याच्या मागणीनंतर आता प्रत्येक पाळीत दोन, असे एकूण सहा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही आपल्या दालनाबाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी केली होती.

रिक्त पदे...

सुरक्षा विभागातील सर्वाधिक रिक्त पदे सुरक्षारक्षकांच्या संवर्गात आहेत. ३,७५१ मंजूर पदांपैकी केवळ १,५५५ पदे भरलेली असून २,१९६ पदे रिक्त आहेत. मुख्य सुरक्षारक्षकांच्या २१५ पदांपैकी १०६ पदे कार्यरत आहेत. सशस्त्र सुरक्षारक्षकांच्या ५८ पदांपैकी ३० पदे भरलेली आहेत. मुख्य सुरक्षारक्षक सशस्त्र या चार पदांवर एकही कर्मचारी नाही. सुरक्षा जमादारांच्या ४७ पदांपैकी केवळ पाच कर्मचारी कार्यरत आहेत.

उद्यानांमध्ये केअर टेकरवरच जबाबदारी

कुर्ला पश्चिमेतील प्रमोद महाजन उद्यानात सुरक्षारक्षक नसून केअर टेकर तैनात असल्याचे समोर आले आहे. केअर टेकरची प्रमुख जबाबदारी उद्यानाची देखभाल आणि दुरुस्तीची असते. त्यामुळे प्रत्यक्ष सुरक्षा आणि अनुचित प्रकार रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील अनेक उद्यानांमध्ये सुरक्षारक्षकांऐवजी केअर टेकरच तैनात असल्याने उद्यानांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)