BMC कडून शाडू मातीच्या पुरवठ्यानंतरही गणेश मूर्तीच्या दरात वाढ; १ फुटाच्या मूर्तीसाठी १२ हजार रुपये मोजावे लागणार

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने शाडू मातीचा पुरवठा मूर्तिकारांना केला जात आहे. पालिकेने आतापर्यंत ८३० टन शाडू मातीचा पुरवठा मूर्तिकारांना केला असला तरी बाजारपेठेत मूर्तींचे दर मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पूनम पोळ/ मुंबई

मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने शाडू मातीचा पुरवठा मूर्तिकारांना केला जात आहे. पालिकेने आतापर्यंत ८३० टन शाडू मातीचा पुरवठा मूर्तिकारांना केला असला तरी बाजारपेठेत मूर्तींचे दर मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहेत. यंदाच्या वर्षी १ फुटाच्या मूर्तीसाठी १२ हजार रुपये, सव्वा फुटाच्या मूर्तीसाठी १५ हजार रुपये आणि दीड फुटाच्या मूर्तीसाठी १८ हजार रुपये दर आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मूर्तिकारांना मंडपांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत पुरवित आहे. या सुविधांचा वापर करून मुंबईतील मूर्तिकारांना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडू माती मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिका क्षेत्रात मागील वर्षी सुमारे ६० हजारांहून अधिक गणेश मूर्ती शाडू मातीपासून बनवल्या होत्या. परंतु यंदा गणेशोत्सव २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना मंडपाकरिता मोफत जागा पुरवित आहे. तसेच मूर्ती घडविण्यासाठी लागणारी पर्यावरणपूरक शाडू मातीही मूर्तिकारांना मोफत देण्यात येत आहे. त्यानुसार सर्व मूर्तिकारांकडून ८५५ टन शाडू मातीची मागणी झाली असून त्यातील ८३० टन शाडू मातीचा पुरवठा मूर्तिकारांना करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने प्रत्येक परिमंडळांमध्ये माती खरेदीसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यातून या शाडू माती खरेदी करून प्रत्येक पंरिमंडळांमधील वॉर्डांना पुरवठा केला जात आहे. तरीही गणेश मूर्तीच्या मूळ बाजारपेठेत मूर्तींचे दर गतवर्षीपेक्षा अधिक आहेत. यंदाच्या वर्षी १ फुटाच्या मूर्तीसाठी १२ हजार रुपये, सव्वा फुटाच्या मूर्तीसाठी १५ हजार रुपये आणि दीड फुटाच्या मूर्तीसाठी १८ हजार रुपये भाविकांना मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी याच गणेश मूर्तींसाठी भाविकांना १० ते १२ हजार रुपये मोजावे लागत होते, अशी माहिती मिळत आहे.

"शाडूची माती जरी पालिकेकडून उपलब्ध झाली असली तरी मातीला आकार देणे, सुबक मूर्ती घडवणे, रंगरंगोटी करणे ही कामे करावीच लागतात. त्यामुळे मूर्तीचे दर वाढतात. तसेच, मागील दोन वर्षांपासून सोशल मीडियामुळे मातीच्या मूर्तीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे." - विशाल शिंदे, त्रिमूर्ती स्टुडिओ

"बाप्पाची मूर्ती विकत घ्यायला गेल्यावर मूर्तीचे दर ठरवणे म्हणजे श्रद्धेचा बाजार केल्यासारखे वाटते. त्यामुळे मूर्तिकार मूर्तीचे जे दर सांगतो, त्या दरात आम्हाला खरेदी करावे लागते. पालिका शाडूची माती मूर्तिकारांना देत जरी असली तरी मूर्तीचे दर दरवर्षी वाढतच आहेत. ते काही केल्या कमी होत नाहीत." - सुनील शेळके, ग्राहक

logo
marathi.freepressjournal.in