मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी चुली, शेकोट्या बंद; हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी BMC ची कडक मार्गदर्शक तत्त्वे

विकासकांनी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करावी. जेणेकरून त्यांना जेवण बनवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे व तत्सम बाबी जाळाव्या लागणार नाहीत आणि पर्यायाने...
मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी चुली, शेकोट्या बंद; हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी BMC ची कडक मार्गदर्शक तत्त्वे
Published on

मुंबई : मुंबईत हवेचे प्रदूषण वाढत असल्याने बांधकामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड अथवा तत्सम वस्तू इंधन म्हणून जाळण्यास तसेच शेकोटी पेटवणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.

बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांसाठी जेवण तयार करण्यासाठी लाकूड आदी इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरात येत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा इंधनांमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरतो तसेच प्रसंगी सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता संबंधित विकासकांनी अशा ठिकाणी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करावी. जेणेकरून त्यांना जेवण बनवण्यासाठी इंधन म्हणून लाकडे व तत्सम बाबी जाळाव्या लागणार नाहीत आणि पर्यायाने धूरही होणार नाही. तसेच, संबंधित बांधकामाची ठिकाणे अधिक सुरक्षित राहतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यासह अन्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी तसेच खासगी संस्था, संघटना आदींनी याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

वायू प्रदूषण नियंत्रणासंदर्भात पालिका मुख्यालयात मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावरील धोरणे, कार्यवाही यांची माहिती सादर केली. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रमाणित कार्यपद्धतीच्या पुढे जाऊन लहानसहान घटकांवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

सेन्सर आधारित प्रणाली

सर्व बांधकाम प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण संनिरीक्षण प्रणाली तैनात करावीत आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण पातळी आढळून आल्यास त्वरित कृती करावी. ही संनिरीक्षण प्रणाली जेव्हा आणि जशी मागणी केली जाईल, त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्यवेक्षणासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल.

पूल, उड्डाणपुलासाठी नियमावली

पूल आणि उड्डाणपुलासारख्या सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी २५ फूट उंचीची बॅरिकेडिंग केलेली असावी. मेट्रो रेल्वे प्रकल्पाची जमिनीच्या वर सुरू असलेली सर्व कामे २५ फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकली जावीत. बांधकामाची जागा ताडपत्री/हिरवे कापड/ज्युट शीटने झाकलेली असावी. बांधकामावेळी स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बांधकाम प्रकल्पांसाठी बंधनकारक बाबी :

-७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्रा/ धातूचे आच्छादन उभारणे अनिवार्य असेल.

-एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंचीचे तर एका एकरपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचे पत्रा/धातूचे आच्छादन लावावे.

-बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना सर्व बाजूंनी हिरवे कापड/ ज्यूट/ ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक आहे.

-बांधकाम पाडताना हे ठिकाण वरपासून खालपर्यंत संपूर्णत: ताडपत्री/ हिरवे कापड/ ज्युट शीटने झाकलेले असावे. प्रत्यक्ष पाडकाम करतेवेळी सातत्याने पाणी शिंपडावे किंवा फवारणी करावी.

-बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी साहित्य चढवताना आणि उतरवताना त्यावर पाण्याची फवारणी करत राहावे. त्यासाठी स्थिर किंवा फिरत्या अँटी स्मॉग गनचा वापर करावा.

-बांधकामाच्या ठिकाणी धूळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा व अन्य साहित्यावर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी करावी.

-बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत (वरच्या बाजूने आणि सर्व बाजूंनीसुद्धा). जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत.

-वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरून वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही.

-सर्व बांधकामाच्या ठिकाणी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.

logo
marathi.freepressjournal.in