

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमातील चालकांचा भार मुंबई महापालिका उचलणार आहे. १९० चालकांचा पगार उसनवारीवर मुंबई महापालिका बेस्ट उपक्रमाला अदा करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
बेस्टला आता मुंबई महापालिका मोठा हातभार लावणार आहे. बेस्टमधील तब्बल १९० उसनवारी तत्त्वावर घेऊन त्यांचा पगाराचा खर्च महापालिका प्रशासन उपक्रमाला अदा करणार आहे. पुढील एक वर्षांकरिता या बसचालकांची सेवा घेतली जात असून यासाठी अतिकालीन भत्त्यासह मासिक पगार स्वरूपात १ लाख २९ हजार १४८ रुपये मोजणार आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाला ३०.६२ कोटी रुपये या चालकसेवेसाठी अदा केले जाणार आहेत.
सद्यस्थितीत मुंबई महापालिकेच्या उपलब्ध वाहनचालकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वाहनसेवा पुरविताना अनेक अडचणी निर्माण होतात. महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष तसेच, महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त/उपआयुक्त, संचालक, अधिष्ठाता, खाते प्रमुख, सहाय्यक आयुक्त इत्यादींना परिवहन खात्यामार्फत वाहनसेवा पुरविल्या जातात. पण अशा वाहनसेवा सुरळीत व विनाखंडित चालू ठेवण्यासाठी, परिवहन विभागातील कार्यरत वाहन चालकांकडून अतिकालीन वेळेत काम करून घेणे अपरिहार्य ठरत आहे.
वाहनचालकांच्या कमतरतेमुळे वाहनसेवांचा पुरवठा अनियमित होतो. त्यामुळे वाहन चालकांची चालकांची अपुरी संख्या आणि परिवहन विभागामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची संख्या यातील तफावत दूर करण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रथमतः बेस्ट उपक्रमांकडून १९० वाहन चालक उसनवारी तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिन्याला कामाचे १०० तास गृहित
बेस्टचे १९० बसचालक हे मुंबई महापालिकेत उसनवारी तत्त्वावर घेण्यात येत आहेत. त्यामुळे महिन्याला १०० तास असे गृहित धरून त्यासाठी मासिक ४५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १९ हजार १४८ रुपये याप्रमाणे १९० चालकांचे ३० कोटी ६२ लाख ३५ हजार ७३८ रुपये एवढी रक्कम अदा करण्यात येत आहे.