

मुंबई : लसीकरण झालेल्या भटक्या श्वानांसाठी क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर वापरण्याचा तंत्रज्ञानाधारित उपक्रम हाती घेतला आहे. या कॉलरच्या माध्यमातून रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्बीजीकरण झालेल्या भटक्या श्वानांची प्रत्यक्ष ओळख पटविणे तसेच त्यांची डिजिटल नोंद ठेवणे आणि मागोवा घेणे अधिक सुलभ होणार आहे. मुंबई महापालिका आणि रिडलान एआय फाऊंडेशन यांच्यात महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी करार करण्यात आला.
उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते, पशूवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण, रिडलान एआय फाऊंडेशनचे अक्षय रिडलान यांच्यासह पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुंबईला २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याच्या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेने महापालिका तंत्रज्ञान आणि डिजिटल माहिती प्रणालीचा वापर करीत आहे. यापूर्वी लसीकरण झालेल्या श्वानांची ओळख रंगीत शाई अथवा इतर तात्पुरत्या खुणांच्या माध्यमातून केली जात असे. कालांतराने अशा खुणा फिकट होणे अथवा नाहीशा होणे शक्य असल्याने दीर्घकालीन ओळख आणि निरीक्षणामध्ये अडचणी येत होत्या.
क्यूआर कोडयुक्त परावर्तित कॉलर वापरण्याच्या या उपक्रमामुळे लसीकरण आणि निर्बीजीकरण झालेल्या श्वानांची ओळख अधिक टिकाऊ, पद्धतशीर आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने करणे शक्य होईल.
लसीकरणाचे निरीक्षण शक्य
लसीकरण, निर्बीजीकरण आणि आरोग्यविषयक उपाययोजनांचे अधिक प्रभावी निरीक्षण करता येईल. ही डिजिटल प्रणाली पुराव्यावर आधारित नियोजनास, आवश्यक हस्तक्षेपांची पुनरावृत्ती टाळण्यास, क्षेत्रीय स्तरावरील निरीक्षण अधिक प्रभावी करण्यास तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, प्राणी कल्याण संस्था, पशुवैद्यकीय पथके आणि इतर संबंधित घटकांमधील समन्वय बळकट करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.