

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी आता जलवाहिन्यावर बटरफ्लाय झडपा बसवण्यात येणार आहे.
सभागृह नेते गणेश खणकर यांनी पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना सूचवल्या होत्या. खणकर यांच्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृह नेते गणेश खणकर यांनी याबाबत वारंवार आवाज उठवून प्रशासनाने यावर प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी केली होती. मागणीची दखल घेत जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरीपासून सुरुवात
प्रशासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले आणि अंधेरी परिसरातील जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवण्यात येणार आहेत. यापूर्वी जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपांचा प्रायोगिक वापर करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर पाणीगळती व पाण्याची नासाडी रोखण्यासाठी अन्य प्रमुख जलवाहिन्यांवरही या झडपा बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
५०० एमएलडी पाण्याची कमतरता
मुंबईला दररोज सुमारे ४६५० एमएलडी पाण्याची गरज असताना सध्या सुमारे ४१५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यातच जलवाहिन्यांमधील गळती, वाहिन्या फुटणे आणि दुरुस्तीच्या प्रक्रियेला लागणारा वेळ यामुळे उपलब्ध पाण्यापैकी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन जलवाहिन्यांमधील पाणीगळती आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी खणकर यांनी सभागृहात सातत्याने मागणी केली होती.
लाखो लीटर पाणी वाया
सध्या अनेक मोठ्या जलवाहिन्यांवर वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक झडपा बंद करण्यासाठी तुलनेने अधिक वेळ आणि मनुष्यबळ लागते. जलवाहिनी फुटल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह तातडीने थांबवता न आल्यास लाखो लिटर पाणी वाया जाते. बटरफ्लाय झडपा ९० अंशात फिरवून जलदगतीने बंद किंवा सुरू करता येत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचा प्रवाह तातडीने नियंत्रित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे जलवाहिनी फुटणे किंवा गळतीच्या प्रसंगी पाण्याची नासाडी कमी करण्यास तसेच दुरुस्तीची कामे अधिक वेगाने हाती घेण्यास मदत होणार आहे.