

मुंबई: माझगाव येथील इंडिया युनायटेड मिल क्रमांक २ व ३ च्या जागेवर मनोरंजन मैदान तथा टेक्सटाईल म्युझियम उभारण्याच्या प्रकल्पासाठी आता मेट्रो उपकर भरण्याचा पर्याय समोर आला आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी आकारला जाणार हा उपकर असून मुंबई महापालिका ३ कोटी १७ लाख रुपयांचा उपकर भरणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून (एनटीसी) सुमारे ३४,५८४.३४ चौ.मी. जमीन महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या दस्तऐवजावर लागू होणारा १ टक्के मेट्रो उपकर पालिकेने भरावा लागणार आहे.
माझगाव येथील न.भू.क्र. ८३१ वर असलेल्या इंडिया युनायटेड मिल क्रमांक २ व ३ च्या एकूण ६४,९४७.३४ चौ.मी. क्षेत्रापैकी ६१,०५६.८९ चौ.मी. जागा एनटीसीने २००९ मध्ये मनोरंजन मैदानासाठी पालिकेला आगाऊ ताब्यात दिली होती. त्यानंतर २०१६ मध्ये राज्य सरकारने ४४ हजार चौ.मी. जागा मनोरंजन मैदान तथा टेक्सटाईल म्युझियम या सार्वजनिक कारणासाठी आरक्षित केली. या आरक्षणातील सुमारे ३४,५८४.३४ चौ.मी. जमिनीवर टेक्सटाईल म्युझियमचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
सवलतीसाठी सरकारची पूर्वमान्यता आवश्यक
जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने एप्रिल २०२४ मध्ये एनटीसीकडे १६ कोटी १२ लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्काची मागणी केली होती. या शुल्काला एनटीसीने हरकत घेतल्याने हस्तांतरण दस्तऐवजाची नोंदणी रखडली. सार्वजनिक सुविधांसाठी विकास हक्कांच्या मोबदल्यात जमीन हस्तांतरणाच्या काही प्रकरणांत मुद्रांक शुल्क सवलतीची तरतूद असल्याचा मुद्दा पालिकेने उपस्थित केला. मात्र, १ टक्के मेट्रो उपकरातून सूट मिळवण्यासाठी राज्य सरकारची पूर्वमान्यता आवश्यक असल्याचे मुद्रांक कार्यालयाने स्पष्ट केले.
बांधकाम जेएसडब्ल्यूकडून सीएसआर निधीतून
पालिकेने जानेवारी २०२६ मध्ये राज्य सरकारकडे उपकरमाफीसाठी पाठपुरावा केला. परंतु अद्याप निर्णय आलेला नाही. त्यामुळे जमीन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी पालिकेनेच ३,१७,१०,४५०.५२ रुपये उपकर भरण्याचा प्रस्ताव आणला आहे. टेक्सटाईल म्युझियमचे बांधकाम जेएसडब्ल्यूकडून सीएसआर निधीतून होत असल्याने बांधकामाचा खर्च पालिकेवर येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उपकराची रक्कम भविष्यात शासनाच्या मंजुरीनंतर परत मिळण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.