Mumbai : आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे; पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासह प्रदूषणाच्या पातळीची अचूक माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai : आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे; पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार
Mumbai : आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे; पालिका १८ कोटी रुपये खर्च करणारसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासह प्रदूषणाच्या पातळीची अचूक माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ही केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच ठिकाणांची निश्चिती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यांत ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबईत विविध यंत्रणांची मिळून २८ वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे कार्यरत आहेत.

मुंबईत सुरू असलेली बांधकामे, विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, विकासकामे आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण यांचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मुंबईतील प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रदूषणाची सद्यस्थिती, हवेतील धूलिकणांचे प्रमाण आणि वायू गुणवत्ता निर्देशांकाची (एक्यूआय) अचूक माहिती मिळवून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महापालिकेसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

सध्याची केंद्रे अपुरी

सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १४, सफरची नऊ आणि मुंबई महापालिकेची पाच अशी एकूण २८ स्वयंचलित वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे कार्यरत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार साधारणतः एक ते पाच लाख लोकसंख्येमागे एक वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र असणे आवश्यक आहे. मुंबईची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेता सध्याची केंद्रे अपुरी पडत असल्याने आणखी केंद्रे उभारण्याचा निर्णय पर्यावरण विभागाने घेतला आहे.

पर्यायी जागेचा शोध सुरू

नवीन केंद्रांसाठी मुलुंड पूर्वेकडील सी. डी. देशमुख उद्यान, गोरेगाव पूर्वेकडील रहेजा उद्यान (दिंडोशी), चर्नी रोड पूर्वेकडील स. का. पाटील उद्यान आणि सांताक्रूझ पश्चिमेकडील स्वामी मुक्तानंद पार्क या चार ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे. पाचव्या केंद्रासाठी दादर पश्चिमेकडील प्रमोद महाजन पार्कजवळील उदंचन केंद्राची जागा प्रस्तावित होती. मात्र, ही जागा मलनिस्सारण प्रचालन विभागाच्या विस्तारित उदंचन केंद्रासाठी राखीव असल्याने संबंधित विभागाने ती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेकडून पर्यायी जागेचा शोध सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)