

अमित श्रीवास्तव/मुंबई :
गोरेगाव येथील आरे वसाहत आणि तेथील २७ आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना आता दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. आरे रुग्णालयाचे हस्तांतरण मुंबई महापालिकेकडे करण्यासाठीचा प्रस्ताव तयार झाला असून ३० वर्षांच्या लीज करारावर पालिका हे रुग्णालय चालवणार आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचा दबाव आणि राज्य विधिमंडळात सातत्याने उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनंतर २०२५ मध्ये राज्य सरकारने हे रुग्णालय पालिकेकडे सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मुळात आरे डेअरीच्या कर्मचाऱ्यांसाठी हे रुग्णालय उभारण्यात आले होते. मात्र, डेअरीतील कर्मचाऱ्यांची संख्या ६०० वरून थेट ६५ वर आल्याने या रुग्णालयाचा वापर मोठ्या प्रमाणात घटला होता. १२५७.९० चौ.मी. क्षेत्रातील रुग्णालय इमारत आणि ६७४.३० चौ.मी. परिसरातील शासकीय निवासस्थाने अशा एकूण १९३२.२० चौ.मी. जागेचे हस्तांतरण पालिकेकडे ‘जैसे थे’ स्थितीत होणार आहे.
स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा
या निर्णयाचे स्वागत करत भाजप नेत्या प्रीती साटम म्हणाल्या, ‘आरेमध्ये पूर्ण क्षमतेने चालणारे रुग्णालय असावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. सध्या आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः सर्पदंश किंवा गंभीर आजार उद्भवल्यास रहिवाशांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात धाव घ्यावी लागते. प्रवासातील या विलंबामुळे अनेकदा रुग्णांचे नुकसान होते. आता पालिकेचे रुग्णालय सुरू झाल्याने उपचारांसाठी मोठा आधार मिळेल.’ भविष्यात केवळ बाह्यरुग्ण सेवाच नाही, तर आंतररुग्ण (इन-पेशंट) सेवाही येथे सुरू व्हाव्यात, अशी आशाही साटम यांनी व्यक्त केली आहे.
आरोग्य सुविधांचा विस्तार
सध्या या रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यरत आहे. पालिका प्रशासनाने ताबा घेतल्यानंतर तेथे आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याची योजना आहे. यामुळे स्थानिक आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांची लांबवर धावपळ थांबणार आहे. हा प्रस्ताव आता सुधार समिती आणि त्यानंतर महापालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.