

मुंबई : पूर्व व पश्चिम उपनगरामधील नाल्यांतील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश ब्रूमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणाली पालिकेच्यावतीने ठिकाणी बसवण्यात आली आहे तर उर्वरीत ठिकाणी सीएसआर निधीतून ही प्रणाली बसवण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई महानगरपालिकेला खारफुटीचा भाग प्लास्टिक मुक्त ठेवण्याकरिता नाले आणि नद्यांमधील तरंगता कचरा वाहून समुद्रात थेट जाण्यापासून रोखण्याकरीता योग्यती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत तसेच तरंगता प्लास्टिक व इतर कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता ट्रॅश ब्रूम बसवण्याची शिफारस केलेली होती.
आयआयटी मुंबई कामाचे ऑडिट करणार
१६ ठिकाणी ट्रॅश बूम बसवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कंत्राट मंजूरीच्या वेळी या कामाचे स्वरुप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ८ ठिकाणी या ट्रॅशबूमचा वापर केला गेला आहे. त्यानुसार आता सीएसआर निधीतून सुभाष नगर नाला, राहुल नगर,माहुल खाडी आदी ठिकाणी ट्रॅशबूम बसवण्यात आले असून उर्वरीत ठिकाणीही बसवण्याचा विचार सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हे ट्रॅशबूमचे तंत्रज्ञान नवीन असल्याने तसेच प्रथमच याचा वापर केला जात असल्याने ऑडिट करण्यासाठी आयआयटी-मुंबई यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
१६ नाल्यांची साफसफाई, ४३ कोटी मंजूर
पूर्व उपनगरातील एकूण १६ नाल्यांमधील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणाली बसवणे आणि त्याचा पुढील ५ वर्षांची देखभाल करणे करणे यासाठी निविदा मागवून कंत्राटदारांची निवड केली. पण या १६ ठिकाणी ट्रॅश बुम बसवण्याऐवजी आवश्यकतेनुसार ८ ठिकाणी ट्रॅश बुम प्रणाली कंपनीकडून बसवण्यात आली. यासाठी ४३.८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार पूर्व उपनगरातील बॉम्बे ऑक्सिजन नाला, पंत नगर नाला, ब्राऊंड्री नाला, नानेपाडा नाला, मानखुर्द नाला, वाशीनाका नाला आणि सोमय्या नाला आदी ठिकाणी या ट्रॅश बूमचा वापर करण्यात आला आहे.