
मुंबई : मुंबई शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मुंबई मनपाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईचा दैनंदिन पाणी वापर २०४१ पर्यंत ६५३५ दशलक्ष लिटर प्रति दिन होण्याचा अंदाज आहे. यासाठी, २०१४ मध्ये बांधलेल्या मध्य वैतरणा धरणानंतर प्रथमच मुंबई महापालिकेने दोन महत्त्वाकांक्षी धरणांचा प्रस्ताव मांडला आहे. यात दशकराच्या विलंबानंतर गारगाई धरणाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, तर पिंजाळ व केंद्राचा दमनगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प, प्रस्तावित समुद्री पाणी गोडे करणारा प्रकल्प आणि कुलाबा येथील १२ एलएलडी क्षमतेचा अत्याधुनिक शुद्धीकरण प्रकल्प यांद्वारे ३१०३ एमएलडी पाण्याचा पुरवठा अपेक्षित आहे. मात्र, पुढील १६ वर्षांत हे धरण पूर्ण करणे एक आव्हान ठरणार आहे.
सध्या मुंबई महापालिका ४ हजार एमएलडी पाण्याचा पुरवठा करत असून जवळपास ५०० एमएलडी पाण्याची टंचाई भासत आहे. लोकसंख्या वाढीमुळे ही तूट ५० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे सध्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण येणार आहे.
या तुटवड्यावर उपाय म्हणून मुंबई मनपाने गारगाई आणि पिंजाळ नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखली.