

मुंबई : घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने आरोग्य सेवेसाठी वैद्य एआय चॅटबॉटची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील सर्व सेवा एकमेकांशी संलग्न करण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये आरोग्य पायाभूत सुविधेच्या तपशिलाचाही समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फॅक्टल अॅनॅलिटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून आरोग्य क्षेत्रासाठीची समर्पित अशी वैद्य एआय (Vaidya AI) या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा ९८९२९९३३६८ या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानस्नेही पुढाकार घेत एक महत्त्वाचा सामंजस्य करार बृहन्मुंबई महानगरपालिका आणि फॅक्टल अॅनॅलिटिक्स लिमिटेड या संस्थेदरम्यान करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे तसेच फॅक्टल नॅलिटिक्स लिमिटेडचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला होता.
नागरिकांची वैद्यकीय उपचारांची माहिती ही चॅटबॉटच्या माहितीचा मुख्य स्त्रोत असणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अधिकाधिक सक्षम पायाभूत आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी हा दुवा महत्वाचा ठरणार आहे. तसेच नागरिकांनाही आपल्या परिसरातील आरोग्य संस्थांच्या सेवांचा तसेच योजनांचा लाभ चॅटबॉटच्या सुविधेच्या माध्यमातून घेता येईल, असा विश्वास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी व्यक्त केला.
केंद्र तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी संलग्न अशा योजनांची माहितीदेखील व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. नागरिकांना या सुविधेचा फायदा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी होईल. त्यासोबतच नागरिकांना या सुविधेच्या निमित्ताने अभिप्राय सादर करण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे मुंबई मनपाच्या आरोग्य सेवेत मोठे बदल होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर वापर!
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या पुढाकाराच्या माध्यमातून नागरिकांसोबतचा संवाद वाढवणे, प्राथमिक टप्प्यातील उपचारासाठीची मदत उपलब्ध करून देणे, बहुभाषिक नागरिकांसोबतचा संवाद करणे आणि रुग्णालय प्रशासनाला कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणे अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर या प्लॅटफॉर्मचा वापर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेसाठी करण्यात येणार आहे.
आरोग्य सेवेसाठी समर्पित व्यासपीठ !
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे दैनंदिन कामकाज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभव्हावे, यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित वैद्य एआय (Vaidya AI) हे आरोग्य क्षेत्रासाठीचे समर्पित असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.