Mumbai : कधी सुरू होणार विक्रोळी पूर्व-पश्चिम उड्डाणपूल? BMC ने दिली महत्त्वाची अपडेट

२०१८ पासून विक्रोळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाण पुलाची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली. आता बीएमसीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगितले आणि कधीपासून हा पूल सुरू करण्याचे नियोजन आहे, याबाबतही महत्त्वाची माहिती दिली.
विक्रोळी उड्डाणपूल मे अखेरीस खुला होणार; पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा मार्ग
विक्रोळी उड्डाणपूल मे अखेरीस खुला होणार; पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा मार्ग संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे बीएमसीने शुक्रवारी सांगितले.

मे २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याची योजना

“सर्व स्टील गर्डर्स प्रकल्प स्थळावर पोहोचवण्यात आले आहेत. हा पूल तीन टप्प्यांमध्ये उभारला जात आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून, सहा गर्डर्स यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्पे, ज्यामध्ये १२ गर्डर्स बसवण्याचे काम आहे, तेही चांगल्या प्रकारे सुरू आहेत. हा पूल मे २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीसाठी सुरू करण्याची योजना आहे,” अशी माहिती महापालिकेने निवेदनाद्वारे दिली.

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वे मार्गावर उभारण्यात येत असलेल्या पुलाची एकूण रुंदी १२ मीटर तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे. त्यापैकी ५६५ मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिका करीत आहे. तसेच उर्वरित ५० मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्ये रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डापुलाचे काम मुंबई महापालिकेच्यावतीने मे २०१८ मध्ये हाती घेतले. तेव्हा ऑक्टोबर २०२० पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र, पुलाच्या रचनेतील बदल, अतिक्रमण, जमीन हस्तांतरणातील अडचणी आणि महामारीसारख्या विविध कारणांमुळे कामात विलंब झाला. त्यामुळे अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली — प्रथम मे २०२३, त्यानंतर डिसेंबर २०२४ पर्यंत आणि आता BMC ने पूल मे २०२५ पर्यंत पूर्ण केला जाईल, असे सांगितले आहे.

किती काम पूर्ण?

सध्या पुलाचे सुमारे ८५% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १५% काम मे २०२५ अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. हा पूल सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ व इंधन वाचवेल. तसेच घाटकोपर, विक्रोळी आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांच्या ५ किमी परिसरातील वाहनचालकांनाही या पुलाचा लाभ होणार आहे. पुलाच्या पूर्व बाजूचे काम ९५% पूर्ण झाले आहे.

दरम्यान, प्रत्येक गर्डर सुमारे २५ मेट्रिक टन वजनाचा असून त्याची लांबी सुमारे २५ ते ३० मीटर दरम्यान आहे. पुलाच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १८ गर्डर्स बसवण्यात येणार असून, प्रत्येक टप्प्यात ६ गर्डर्स असतील. पहिल्या टप्प्यातील सहा गर्डर्स यशस्वीरित्या बसवण्यात आले आहेत. उर्वरित दोन टप्प्यांचे काम देखील चांगल्या गतीने सुरू आहे. पुलाचे एकूण १९ खांब असून, त्यापैकी १२ खांब पूर्व बाजूस आणि ७ खांब पश्चिम बाजूस आहेत आणि सर्व खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in