

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे ८९, तर शिंदेसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेत सत्ता स्थापनेसाठी ११४चा आकडा गाठणे गरजेचे असून भाजप व शिवसेनेचे संख्याबळ ११८ वर पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईत भाजप व शिंदेसेनेचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. मात्र विरोधी पक्षात ठाकरे सेना नंबर वन असून ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. १८ प्रभाग समितींपैकी ८ प्रभाग समित्यांत ठाकरेंचे राज्य येण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर व उपनगरातील पालिकेच्या विभागमध्ये महायुती व ठाकरे बंधूंची समसमान सत्ता येणार आहे. पालिकेमध्ये व २६ विभाग कार्यालयांच्या १८ प्रभाग समित्या आहेत. १८ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे नगरसेवक अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होते.
एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांची गोवंडी एम पूर्व विभागात सत्ता येणार आहे. या प्रभाग समितीवर एमआयएमचे आठ सदस्य, तर भाजप-शिवसेनेचे सहा व ठाकरे यांचा एक नगरसेवक असणार आहे.
भांडुप एस विभाग व मुलुंड विभाग प्रभाग समितीवर ठाकरे बंधू व महायुतीचे समसमान सदस्य राहणार आहेत. त्यामुळे येथील अध्यक्ष हा चिठ्ठीवर ठरणार आहे. त्यामुळे या समितीवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष विराजमान होणार याचा अंदाज बांधणे शक्य नाही. चिठ्ठीमध्ये ठाकरेंचा अध्यक्ष झाल्यास मुंबई शहर व उपनगरात महायुतीपेक्षा ठाकरेंचे वर्चस्व राहू शकते.
कोणत्या प्रभाग समितीवर कोणाची सत्ता
१) ए बी ई - आघाडी
२) सी डी - महायुती
३) एफ दक्षिण एफ उत्तर - आघाडी
४) जी दक्षिण - आघाडी
५) जी उत्तर - आघाडी
६) एच पूर्व व एच पश्चिम - आघाडी
७) के दक्षिण - महायुती
८) के उत्तर - आघाडी
९) के पश्चिम - महायुती
१०) पी दक्षिण - महायुती
११) पी पूर्व व पी पश्चिम - आघाडी
१२) आर दक्षिण - महायुती
१३) आर मध्य व आर उत्तर - महायुती
१४) एम पूर्व - एमआयएम
१५) एम पश्चिम - महायुती
१६) एस व टी - समसमान सदस्य
१७) एल - आघाडी
१८) एन - महायुती