
मुंबई : शहरातील मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी मुंबईतील काही भागांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पांजरापूर येथील ३A पंपिंग स्टेशनमध्ये २३०-व्होल्ट AC कॉन्टॅक्टर बिघडल्याने डिझेल जनरेटर (DG) सेट बंद पडला आणि त्यामुळे अनेक पंप ट्रिप झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ने दिली आहे.
दुरूस्तीचे काम ‘युद्धपातळीवर’, पाणीपुरवठा कमी दाबाने
महापालिकेच्या माहितीनुसार, खराब झालेला कॉन्टॅक्टर तातडीने बदलणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी सुमारे एक तास संपूर्ण विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी दुरूस्तीचे काम ‘युद्धपातळीवर’ सुरू आहे. या काळात पाणीपुरवठा सुरू राहील, परंतु पाण्याचा दाब लक्षणीयरीत्या कमी राहणार आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पांजरापूर पंपिंग स्टेशनवर अवलंबून असलेल्या मुंबईतील मोठ्या भागाला याचा फटका बसणार आहे.
टँकर सेवा सज्ज, पाणी जपून वापरा - बीएमसीचे आवाहन
महापालिकेचे अभियंते घटनास्थळी पोहोचले असून वीज विभागाच्या सहकार्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. “पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी टीम ‘युद्धपातळीवर’ काम करत असून दुरूस्ती पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल,” अशी माहिती BMC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बीएमसीच्या वतीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत टँकर सेवा सज्ज ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा
पांजरापूर पंपिंग स्टेशन हे मुंबईतील महत्त्वाचे पाणीपुरवठा केंद्र असून ते शहराच्या दररोजच्या पाणी वितरणाचा मोठा भाग सांभाळते. देखभाल किंवा तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरते अडथळे येणे नवीन नाही, मात्र आजचा बिघाड मुंबईच्या जुन्या पायाभूत जलव्यवस्थेवरील ताण अधोरेखित करतो. दुरुस्ती पूर्ण होताच संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.