
मुंबई : महसूल वाढीसाठी महापालिका प्रशासनाने क्रॉफर्ड मार्केटजवळची छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मलबार हिलचे बेस्टचे पॉवर स्टेशन आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय पालिकेने तात्पुरता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑक्टोबर महिन्यात मागवण्यात आलेल्या अर्जाची मुदत १६ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र, या कालावधीत एकही अर्जदाराकडून प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ही निविदा प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे.
दरम्यान, या जागांसाठी पुनर्निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता विभागातील एका अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई महापालिका प्रशासनाने काही विनावापर असलेल्या आणि भविष्यात ज्या जागांची महापालिकेला गरज नाही असे भूखंड भाडेतत्त्वावर देऊन त्यातून महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन भूखंड लिलाव पद्धतीने भाडेकरारावर देण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा समावेश आहे. येथील मंडई पाडण्यात आली असून यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केटमधील जागेमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या जागेवर मंडई आणि महापालिका कार्यालय असे आरक्षण आहे. परंतु ही जागा भाडेकरारावर दिल्यानंतर यावरील आरक्षण पूर्णपणे काढून ही जागा भाडेकरारावर देऊन त्याचा वापर निवासी किंवा वाणिज्य वापरासाठी बांधकाम करता येईल अशाप्रकारच्या अटी या करारात होत्या.
सध्या मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येत असल्याने रस्त्यांच्या बांधकामासाठी डांबराचा वापर कमी होत आहे. त्यामुळे महापालिकेचा अस्फाल्ट प्लांटच्या जागेचा वापर कमी होणार आहे. त्यामुळे या जागेचा काही भाग हा भाडेकरारावर देऊन उर्वरित भाग लॅब करता ठेवणे असे निश्चित करण्यात आले, तर मलबार हिल येथील एका जागेवर बेस्ट रिसिव्हिंग स्टेशन आहे. या रिसिव्हिंग स्टेशनच्या आकार कमी करून यातील काही भाग भाडेकरारवर देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. हे तिन्ही भूखंड सध्या विना वापर पडून असल्याने महापालिकेने हे भूखंड भाडेकरारावर देऊन यातून महापालिकेला अधिकाधिक महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी मागवलेल्या स्वारस्य अभिरुची अर्जाद्वारे महापालिकेला या भूखंडातून किती निधी प्राप्त होऊ शकतो, याचा अंदाज येईल. आणि त्यानुसार महापालिका त्या भूखंडासंदर्भात रक्कम निश्चित करून भाडेकराराची रक्कम ठरवली जाईल, असा विचार पालिकेचा होता. पण प्रत्यक्षात यासाठी मागवलेल्या स्वारस्य अर्जाला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर येत्या वर्षात पुनर्निविदा काढण्याचा प्रस्ताव असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
या जागांचा होणार होता लिलाव
■ महापालिका डी विभागातील बेस्ट रिसिव्हिंग स्टेशन, सीएस क्रमांक ४३९ (अंशतः)
जागेचे क्षेत्रफळ : २,४०० चौरस मीटर
■ वरळी अस्फाल्ट प्लांट, सीएस क्रमांक १६२९ (अंशतः) जागेचे क्षेत्रफळ : निश्चित करण्यात आलेले नाही
■ महापालिका ए वॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज मंडई, सीएस क्रमांक १५०० (अंशतः) जागेचे क्षेत्रफळ : ८६०० चौरस मीटर